डोकलामप्रश्‍नी बळाचा वापर नको: जपानचा चीनला गर्भित इशारा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी भारत चीनबरोबर राजनैतिक मार्गांनी चर्चा करेल, असेही भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्प्पष्ट केले आहे. तेव्हा या प्रकरणी कोणीही बळाचा वापर करुन परिस्थिती एकहाती बदलण्याचा प्रयत्न करु नये

टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जपानकडून भारतास ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. डोकलाम येथील प्रत्यक्ष परिस्थिती बळाचा जोरावर बदलण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये, असा स्पष्ट इशारा जपानकडून देण्यात आला आहे.

डोकलाम येथे भूतानच्या हद्दीमध्ये घुसखोरी करत रस्ता बांधण्याचा चीनचा प्रयत्न भारताने उधळून लावला आहे. यानंतर संतप्त चीनकडून अनेकदा इशारे देण्यात आले आहेत. मात्र भारताकडून या प्रकरणी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर जपानचे राजदूत केंजी हिरामात्सु यांनी या प्रकरणी जपानची भूमिका स्पष्ट केली आहे.

"डोकलाम येथील भारताची भूमिका भूतान-भारत द्विपक्षीय करारावर आधारलेली आहे. या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी भारत चीनबरोबर राजनैतिक मार्गांनी चर्चा करेल, असेही भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्प्पष्ट केले आहे. शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याची ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे, अशी जपानची धारणा आहे. तेव्हा या प्रकरणी कोणीही बळाचा वापर करुन परिस्थिती एकहाती बदलण्याचा प्रयत्न करु नये,'' असे हिरामात्सु म्हणाले.

डोकलाम प्रकरणाचे पडसाद गेल्या सुमारे दोन महिन्यांत भारत-चीन सीमारेषेवर अन्य ठिकाणीही उमटले आहेत. अमेरिकेने या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत व चीन यांनी राजनैतिक चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. दक्षिण व दक्षिण पूर्व आशियामध्ये तप्त पडसाद उमटत असलेल्या या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर जपानने भारतास व्यक्‍त केलेला पाठिंबा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Doklam stand-off: Japan backs India