डोकलाम येथून भारत व चीनच्या सैन्यांची एकाच वेळी माघार..!

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

"भारत व चीन या दोन्ही देशांनी डोकलाम येथून सैन्य मागे घेण्यास मान्यता दिली असून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या नवीन घडामोडीचे वर्णन परराष्ट्र मंत्रालयाकडून "डोकलाम डिसएंगेजमेंट अंडरस्टॅंडिंग' असे करण्यात आले आहे

नवी दिल्ली - भारत-भूतान-चीन असे सीमारेषांचे ट्रायजंक्‍शन असलेल्या डोकलाम येथे चिनी सैन्याने भूतानच्या सीमारेषेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केल्यानंतर निर्माण झालेला तणाव निवळण्याचे सकारात्मक संकेत दिसू लागले आहेत. डोकलाम येथे गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने द्विपक्षीय संबंधांत व एकंदरच जागतिक राजकारणामध्ये अत्यंत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. मात्र डोकलाम येथून भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकावेळी हळुहळू मागे घेतले जात असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आज (सोमवार) देण्यात आली.

"भारत व चीन या दोन्ही देशांनी डोकलाम येथून सैन्य मागे घेण्यास मान्यता दिली असून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे,'' असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या नवीन घडामोडीचे वर्णन परराष्ट्र मंत्रालयाकडून "डोकलाम डिसएंगेजमेंट अंडरस्टॅंडिंग' असे करण्यात आले आहे. भारतासाठी हा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.

डोकलाम येथे चिनी सैन्याने गेल्या 16 जून रोजी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारताने या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेऊन कृती केल्यानंतर संतप्त चीनकडून गेल्या दोन महिन्यांत अनेकदा निर्वाणीचे इशारे देण्यात आले होते. विशेषत: ग्लोबल टाईम्स या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून अनेकदा विविध प्रकारे भारताला गर्भित धमक्‍याही देण्यात आल्या होत्या. याशिवाय तिबेट भागात चिनी सैन्याने डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर भारतावर दबाव आणण्याच्या उद्देशार्थ "युद्धसराव'ही केला होता. मात्र भारताकडून या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेत डोकलाम येथून एकतर्फी सैन्य मागे घेण्याच्या चीनच्या मागणीस भीक घालण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: यासंदर्भात राज्यसभेत बोलताना भारतीय भूमिका स्पष्ट केली होती. अर्थातच, या काळात भारत व चीनमध्ये सातत्याने राजनैतिक चर्चाही करण्यात येत होती. या तणावग्रस्त पार्श्‍वभूमीवर डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैन्यांनी घेतलेली माघार भारतीय दृष्टिकोनामधून अत्यंत दिलासादायक वृत्त मानले जात आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई

Web Title: Doklam standoff: India, China begin to pull troops out from site, says MEA