उत्तर कोरियाबरोबर मोठा संघर्ष शक्‍य

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा; राजनैतिक मार्गांनी तोडगा अवघड असल्याचे मत

वॉशिंग्टन: उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम पाहता त्यांच्याबरोबर "मोठा संघर्ष' होण्याची शक्‍यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज व्यक्त केली. कोरियामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा इशारा चीननेही दिला आहे. ट्रम्प यांना अध्यक्षपदावर येऊन शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावरील भूमिका मांडली.

उत्तर कोरियाप्रश्‍नी शांततापूर्ण मार्गाने, शक्‍यतो आर्थिक बंधनांच्या जोरावर, तोडगा काढण्याची आपली इच्छा असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, या मार्गानेही समस्या सुटली नाही तर लष्करी कारवाईचाही पर्याय खुला असल्याचे ट्रम्प म्हणाले. "उत्तर कोरिया हे जगासमोरील मोठे आव्हान आहे. राजनैतिक मार्गाने त्यांच्याशी चर्चा करणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्याबरोबर फार मोठा संघर्ष होणे शक्‍य आहे,' असेही ट्रम्प म्हणाले. उत्तर कोरियाचा एकमेव मित्र असलेला चीनही आपल्या या मित्राच्या अणू कार्यक्रमामुळे अस्वस्थ आहे. चीनने थेट दबाव आणूनही उत्तर कोरियाने अणू कार्यक्रम राबविताना क्षेपणास्त्र चाचण्या सुरूच ठेवल्याने तणाव वाढला आहे. हा तणाव आणखी वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्‍यता चीनने व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चीन आणि रशिया यांच्यामध्ये झालेल्या बैठकीवेळी चीनने ही शक्‍यता व्यक्त केली.

तैवानशी पुन्हा चर्चा नाही
तैवानच्या अध्यक्षांबरोबर दूरध्वनीवरून पुन्हा एकदा चर्चा करण्याची कल्पना धुडकावल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. उत्तर कोरियाच्या प्रश्‍नावर चीन अतिशय योग्य सहकार्य करत असून, तैवानशी चर्चा करून त्यांना दुखावण्याचे कारण नाही, असे ट्रम्प म्हणाले.

दक्षिण कोरियालाही दिला धक्का
उत्तर कोरियाबरोबर संघर्षाची शक्‍यता बोलून दाखविणाऱ्या ट्रम्प यांनी मित्र देश असलेल्या दक्षिण कोरियालाही धक्का दिला आहे. दक्षिण कोरियामध्ये बसविलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी अमेरिकेला 1 अब्ज डॉलर मिळावेत, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. याबाबत पाच वर्षांपूर्वी झालेला करार अस्वीकारार्ह असून, फार तर याबाबत चर्चा करता येईल, असे ट्रम्प यांनी आज सांगितले. हा करार रद्द करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या विधानानंतर दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: donald trump and north korea