
अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात पोर्नस्टारला पैसे देऊन गप्प केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अटक करण्यात आली.
Donald Trump : माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्नस्टारला पैसे देण्याचे प्रकरण भोवले
न्यूयॉर्क - अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात पोर्नस्टारला पैसे देऊन गप्प केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) अटक करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये न्यायालयाबाहेर त्यांचे हजारो समर्थक गोळा झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प हे मंगळवारी त्यांच्या खासगी विमानाने येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांचा ताफा मॅनहटन येथील ‘ट्रम्प टॉवर’कडे रवाना झाला. त्यांच्या या निवासस्थानाभोवती नाकेबंदी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त राखण्यात आला होता. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली. यावेळी ट्रम्प हे न्यायालयात हजर झाले. यानंतर ट्रम्प यांना पोलिसांनी अटक केली. ट्रम्प हे २०२४ मधील निवडणूक लढविणार असल्याने हा खटला त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
पहिले माजी राष्ट्राध्यक्ष
गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्याला सामोरे जाणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी अध्यक्ष ठरले आहेत. एका पोर्नस्टारने ट्रम्प यांच्यावर आरोप केल्यानंतर गप्प राहण्यासाठी ट्रम्प यांनी तिला पैसे दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांच्यावर अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत.
प्रचंड सुरक्षा व्यवस्था
डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो समर्थक न्यूयॉर्कमध्ये गोळा झाले. ट्रम्प समर्थकांनी यापूर्वी घातलेला गोंधळ आणि मोठे आंदोलन करण्याची ट्रम्प यांनी केलेली घोषणा लक्षात घेऊन पोलिसांनी प्रचंड फौजफाटा तैनात ठेवला होता. न्यायालयाच्या परिसरात नाकेबंदी करण्यात आली. याशिवाय, साध्या वेशातील ३५ हजार पोलिस परिसरात तैनात करण्यात आले होते.