ट्रम्प प्रशासनाकडून मोठी करकपात

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

समान पातळीवर स्पर्धा 
कंपनीकर सरसकट 15 टक्के करण्याबरोबरच ट्रम्प प्रशासनाने प्रादेशिक करप्रणालीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना समान पातळीवर स्पर्धा करता येणार आहे. कंपन्यांचे विदेशांमध्ये अडकलेले अब्जावधी डॉलर परत आणल्यास त्यावर एकरकमी कर आकारला जाणार आहे. अमेरिकेच्या एकूण करप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सर्वच स्तरांवरील व्यक्तींना फायदा होणार असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

वॉशिंग्टन - व्यवसाय आणि वैयक्तिक अशा दोन्ही विभागांत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने मोठी करकपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनी कर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्‍क्‍यांवर आणण्याचा हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या करकपातीपैकी एक असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

करकपात जाहीर करून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली आहे. कंपनीकर 35 टक्‍क्‍यांवरून 15 टक्के, वैयक्तिक करांचे दर लक्षणीयरीत्या कमी करणे आणि काही कर रद्द करणे अशा नव्या कर प्रस्तावातील तरतुदी आहेत. याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन नुचिन म्हणाले, ""यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील अडथळे दूर झाले आहेत. आता उद्योगांना नवे बळ मिळण्याबरोबरच अनेक रोजगार निर्माण होतील आणि परदेशांमध्ये अडकलेले अब्जावधी डॉलर पुन्हा चलनात येतील. अर्थव्यवस्थावाढीसाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीच करसुधारणेचा हा प्रस्ताव आहे.'' 

वैयक्तिक करांमध्ये ट्रम्प प्रशासनाने सध्याच्या सात प्रकारची वर्गवारी बंद करून केवळ 10 टक्के, 25 टक्के आणि 35 टक्के असे तीनच वर्ग ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे प्रमाणित करकपात दुप्पट होऊन लहान मुले आणि आजारी व्यक्ती असलेल्या कुटुंबांना करांमध्ये दिलासा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. नव्या कर सुधारणेच्या प्रस्तावानुसार मोठा कर भरणाऱ्यांना फायदा, स्वतःचे घर असणाऱ्यांना संरक्षण, देणगीदारांना फायदा मिळणार आहे. तसेच, छोट्या व्यावसायिकांना त्रासदायक ठरणारे काही करही रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळणे बाकी आहे. 

समान पातळीवर स्पर्धा 
कंपनीकर सरसकट 15 टक्के करण्याबरोबरच ट्रम्प प्रशासनाने प्रादेशिक करप्रणालीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना समान पातळीवर स्पर्धा करता येणार आहे. कंपन्यांचे विदेशांमध्ये अडकलेले अब्जावधी डॉलर परत आणल्यास त्यावर एकरकमी कर आकारला जाणार आहे. अमेरिकेच्या एकूण करप्रणालीमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सर्वच स्तरांवरील व्यक्तींना फायदा होणार असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

Web Title: Donald Trump is fumbling his real chance at tax reform