अंदाज चुकवत ट्रम्प यांची बाजी 

अंदाज चुकवत ट्रम्प यांची बाजी 

वॉशिंग्टन - सगळ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज चुकवत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (वय 70) यांनी बाजी मारली. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रातिनिधिक मतांचा (इलेक्‍टोरल कॉलेज) पाठिंबा ट्रम्प यांना मिळाला. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 538 प्रातिनिधिक मतांपैकी 270 प्रातिनिधिक मते आवश्‍यक असतात. ट्रम्प यांना 289, तर हिलरींना 218 प्रातिनिधिक मते मिळाली. अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून ट्रम्प सूत्रे स्वीकारतील. 

शेवटपर्यंत अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत ट्रम्प यांना 59,044, 562 मते (47.5 टक्के) मिळाली, तर हिलरींना 59,182,281 मते (47.6 टक्के) मिळाली. दहशतवाद, स्थलांतरितांचा प्रश्‍न आणि देशांतर्गत रोजगारासंदर्भात ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या कडव्या मतांमुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अमेरिकेचे उर्वरित जगाबरोबरचे संबंध कसे राहणार, याचे औत्सुक्‍य आहे. 

ट्रम्प यांच्या विजयामुळे महासत्तेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचे हिलरी क्‍लिंटन यांचे स्वप्न भंगले आहे. कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या अब्जाधीश आणि "मीडिया बॅरन' या उपाधीने प्रसिद्ध असलेल्या ट्रम्प यांचा विजय आश्‍चर्यकारक मानला जातो. या पूर्वीच्या मतचाचण्यांमध्ये हिलरी आघाडीवर होत्या; पण अखेरच्या क्षणी बाजी मारत ट्रम्प यांनी "व्हाइट हाउस'मध्ये प्रवेश निश्‍चित केला. त्यांच्या विजयामुळे "व्हाइट हाउस'मध्ये गेली आठ वर्षे असलेली डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता संपुष्टात येणार आहे. पेनसिल्व्हेनिया, ओहियो, फ्लोरिडा, टेक्‍सास आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यांचा ट्रम्प यांना मोठा पाठिंबा मिळाला. 

"आता आपण सर्व एकत्र येण्याची गरज आहे. मी सर्व अमेरिकनांचा अध्यक्ष म्हणून काम करेन,' असे ट्रम्प यांनी समर्थकांच्या मेळाव्यापुढे बोलताना सांगितले. हिलरींनी आपल्याशी संपर्क साधून आपले अभिनंदन केल्याचेही ते म्हणाले. "आमचा केवळ प्रचार नव्हता, तर ती चळवळ होती. सर्वांना एकत्र करून देशाच्या फेरउभारणीसाठी आपण काम करू, आपल्या देशात ती धमक नक्कीच आहे,' असेही त्यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा उभारण्यावर आपला भर असेल, असे त्यांनी सांगितले. 

परराष्ट्र मंत्रिपदी असताना हिलरींनी केलेल्या खासगी ई-मेलच्या वापराची पुन्हा चौकशी करण्याच्या"एफबीआय'च्या निर्णयाचाही ट्रम्प यांना फायदा झाल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. चौकशीनंतर "एफबीआय'ने हिलरींना "क्‍लीन चिट' दिली असली तरी, त्याला फार उशीर होऊन ट्रम्प यांचा फायदा झाल्याचे हे तज्ज्ञ म्हणतात. 

ट्रम्प यांच्या बाजूने... 

"सीएनएन' या वाहिनीच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांना 29, तर हिलरींना 18 राज्यांनी पाठिंबा दिला. या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी पेनसिल्व्हेनिया, फ्लोरिडा, अलास्का, यूटा, आयोवा, ऍरिझोना, विस्कॉन्सिन, जॉर्जिया, ओहियो, नॉर्थ कॅरोलिना, नॉर्थ डाकोटा, साउथ डाकोटा, नेब्रास्का, कन्सास, ओक्‍लहोमा, टेक्‍सास, व्योमिंग, इंडियाना, केंटुकी, टेनेसी, मिसिसिपी, अर्नान्सस, लुझियाना, वेस्ट व्हर्जिनिया, अलाबामा, साउथ कॅरोलिना, मोंटाना, इडाहो आणि मिसुरी या राज्यांत बाजी मारली. 

हिलरी यांच्या बाजूने... 

हिलरी यांना कॅलिफोर्निया, नेवाडा, हवाई, इलिनॉय, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, मेरीलॅंड, डिस्ट्रिक्‍ट ऑफ कोलंबिया, व्हरमॉंट, मॅसेच्युसेट्‌स, कनेक्‍टिकट, डेलवेअर, कोलोरॅडो, न्यू मेक्‍सिको, व्हर्जिनिया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि ऱ्होड आयलंड यांचा पाठिंबा मिळाला. 

वादग्रस्त विधाने 

राजकारणाचा काहीही अनुभव नसलेल्या ट्रम्प यांची वादग्रस्त विधाने प्रचारात गाजली होती. महिला, स्थलांतरितांबाबत त्यांनी टोकाची मते व्यक्त केली होती. अनेक महिलांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचे आरोपही केले होते. त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील दिग्गजांनीही त्यांना पाठिंबा देणे नाकारले होते. मात्र, तरीही ट्रम्प यांनी मिळवलेला विजय आश्‍चर्यकारक मानला जातो. यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचाराने खालची पातळी गाठली होती. ट्रम्प आणि हिलरी यांनी परस्परांवर व्यक्तिगत आरोप केले होते. 

ट्रम्प आज "व्हाइट हाउस'मध्ये 

निवडणुकीतील विजयाबद्दल अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले असून, उद्या (ता. 10) "व्हाइट हाउस'मध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. अध्यक्षपदाच्या कामाचे हस्तांतर करण्यासंदर्भात ओबामा यांनी ट्रम्प यांना हे निमंत्रण दिल्याची माहिती "व्हाइट हाउस'च्या प्रवक्‍त्याने दिली. ओबामांनी निमंत्रण दिल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांच्या प्रचारप्रमुख केलिन कॉनवे यांनीही दुजोरा दिला. ओबामांचा फोन आला तेव्हा ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये समर्थकांपुढे भाषण देत होते. नंतर त्यांनी लगेच ओबामांबरोबर संपर्क साधल्याचे त्या म्हणाल्या. 

अशी झाली निवडणूक 

22.57 कोटी 

एकूण मतदार 

538 

प्रातिनिधिक मते 

270 

विजयासाठी आवश्‍यक प्रातिनिधिक मते 

29 

ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिलेली राज्ये 

18 

हिलरींच्या बाजूने कौल दिलेली राज्ये 

आमचा केवळ प्रचार नव्हता, तर ती चळवळ होती. सर्वांना एकत्र करून देशाच्या फेरउभारणीसाठी आपण काम करू, आपल्या देशात ती धमक नक्कीच आहे. 

- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष 

अमेरिका निवडणूक 

यशापयशाची कारणे... 

डोनाल्ड ट्रम्प 

- अमेरिकेला महान बनविण्याचे आश्‍वासन लोकांना भावले 

- इसिसच्या विरोधातील थेट भूमिका मांडल्याने पारडे जड 

- गन कल्चरला पाठिंबा दिल्याने शस्त्र उद्योग लॉबी बाजूने 

- भाषा राष्ट्रवादाला पसंती दिल्याने तरुणांमध्ये खळबळ 

- यहुदी लॉबी पाठीशी; प्रचार, फंडिंगमध्ये त्यांचा मोठा वाटा 

हिलरी क्‍लिंटन 

- आजारी असल्याने जबाबदारी पेलवणार नाही ही भावना 

- अर्थव्यवस्था कोलमडल्याने "डेमोक्रॅटिक'बाबत नाराजी 

- प्रचारात यहुदी बॉडीचे हिलरीऐवजी ट्रम्प यांना झुकते माप 

- गन कल्चरच्या विरोधी भूमिकेमुळे शस्त्र उद्योग लॉबी विरोधात 

- ई मेलसाठी प्रायव्हेट सर्व्हर वापरल्याच्या आरोपाचा फटका 

538 : प्रातिनिधिक मते 

270 : बहुमतासाठी आवश्‍यक 

288 : डोनाल्ड ट्रम्प 

215 : हिलरी क्‍लिंटन 

29 : राज्ये ट्रम्पच्या बाजूने 

18 : राज्ये हिलरींच्या बाजूने 

20 जानेवारी 2017 रोजी ट्रम्प घेणार अध्यक्षपदाची शपथ 

राजकीय उलथापालथ... 

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 45वे अध्यक्ष 

हिलरी क्‍लिंटन यांच्याकडून ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन 

ट्रम्प यांचे सहकारी माईक पेन्स यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा 

निकालात फ्लोरिडा, ओहायोसारख्या राज्यांची महत्त्वाची भूमिका 

"यूएस इलेक्‍शन डे'ने तोडला ट्‌विटरचा विक्रम; 3.5 कोटी ट्‌विट 

ट्रम्प समर्थकांमध्ये उत्साह; हिलरी यांच्या समर्थकांमध्ये निराशा 

कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना ट्रम्पनी घडविला इतिहास 

प्रचारात ट्रम्प यांच्या चारित्र्यावर, तर हिलरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप 

निकालानंतर जगभरातील शेअर बाजारांत पडझड; डॉलरचे भावही कोसळले 

भारतीयांची छाप 

- कमला हॅरिस यांची सिनेटच्या (वरिष्ठ सभागृह) सदस्यपदी निवड 

- प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती, अमी बेरा, 

रो खन्ना यांची प्रतिनिधीगृहाच्या (कनिष्ठ सभागृह) निवड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com