अमेरिकेच्या संसदेत एच1-बी व्हिसा विधेयक सादर

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अमेरिकी स्थलांतर विधेयकाबाबत नवीन मसुदा तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये अमेरिकी नागरिकांना नोकरीवर ठेवण्यात प्राधान्य देण्यात आले आहे. बहुतांश परदेशी नागरिक अमेरिकेत एच1बी व्हिसा परवान्यावर काम करतात.

वॉशिंग्टन: अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारतीय आयटी क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी गृहात एच1-बी म्हणजेच अमेरिकी स्थलांतर विधेयक मांडण्यात आले आहे. अमेरिकी संसदेत स्थलांतर विधेयक मांडल्यानंतर भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

एच1-बी व्हिसाधारकांचे वेतन दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. एच1-बी व्हिसा विधेयकानुसार एच1-बी व्हिसाधारकांचे वार्षिक वेतन एक लाख तीस हजार डॉलर करावे लागणार आहे. जे सध्या 60,000 अमेरिकी डॉलर आहे. भारतीय आयटी कंपन्यांच्या दृष्टीने ही नकारात्मक बाब आहे. परिणामी याचा भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकी स्थलांतर विधेयकाबाबत नवीन मसुदा तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये अमेरिकी नागरिकांना नोकरीवर ठेवण्यात प्राधान्य देण्यात आले आहे. बहुतांश परदेशी नागरिक अमेरिकेत एच1बी व्हिसा परवान्यावर काम करतात.

भारतातून होणाऱ्या सॉफ्टवेअर निर्यातीत 60 टक्के वाटा अमेरिकेचा आहे. तसेच भारतीय आयटी कर्मचाऱ्यांचा अमेरिकेतील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचा हातभार लावला जातो. ही बाब दोन्ही देशांसाठी तितकीच फायदेशीर आहे. त्यामुळे एच1बी आणि एल-1 व्हिसा शुल्कातील वाढीचा भारतीय कर्मचाऱ्यांवरच नाही तर अमेरिकन बाजारपेठेवरदेखील परिणाम होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसच्या एकूण उत्पन्नात अमेरिकेचे 56 टक्के योगदान आहे. तसेच इन्फोसिस आणि विप्रो यांच्या उत्पन्नात अनुक्रमे 62 आणि 55 टक्के योगदान आहे. आज मुंबई शेअर बाजारात आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सध्या इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाली आआहे. तो 909.90 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 38.45 रुपयांची म्हणजेच 4.05 टक्क्यांची घसरण झाली आहे. टीसीएस 2220.80 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात 116.20 रुपयांची म्हणजेच 4.97 टक्क्यांची घसरण झाली आहे. तसेच विप्रोचा शेअर 10.40 रुपयांनी म्हणजेच 2.24 टक्क्यांनी घसरला आहे. शेअर सध्या 454.25 रुपयांवर व्यवहार करतो आहे.

Web Title: Donald Trump likely to issue executive order to limit H1-B visas