अमेरिकेतील 3 लाख भारतीयांचे "डिपोर्टेशन'?

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

स्थलांतरितांसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा संशय असलेल्या कोणत्याही नागरिकास अटक करण्याचा अधिकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांस असेल

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अधिकृत नागरिकत्व न घेतलेल्या तब्बल 1.1 कोटी स्थलांतरितांना देशाबाहेर धाडण्याच्या (डिपोर्टेशन) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेचा या देशात सध्या राहत असलेल्या किमान 3 लाख भारतीयांना फटका बसण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे.

अमेरिकेतील लक्षावधी स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्यासंदर्भातील या योजनेची मुलभूत तयारी पूर्ण झाली आहे. या योजनेस कोणाचाही अपवाद केला जाणार नसल्याचा इशारा येथील देशंतर्गत सुरक्षा (होमलॅंड) मंत्रालयाने दिला आहे.

"स्थलांतरितांसंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा संशय असलेल्या कोणत्याही नागरिकास अटक करण्याचा अधिकार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांस असेल,'' असे यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या स्थलांतरितांना विशेष लक्ष्य केले जाणार असले; तरी तांत्रिकदृष्टया बेकायदेशीर असलेल्या इतर स्थलांतरितांवर कारवाई केले जाण्याची शक्‍यता आहे.

अमेरिकेत सध्या किमान 3 लाख भारतीय अशा स्वरुपाने राहत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थलांतरितांसंदर्भातील या धोरणासहच ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेकडून जागतिक व्यापारासंदर्भात "प्रोटेक्‍शनिज्म'ची भूमिका घेतली जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रास याचा प्रामुख्याने फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Donald Trump's immigration plans could impact 3 lakh Indian-Americans