ट्रम्प, भारताकडून पोलाद घेऊ नका: डेमोक्रॅट सिनेटर्स

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

भारत व इटलीसारख्या देशांमधील पोलाद वापरण्याची परवानगी देऊन आपण चुकीचा पायंडा पाडत आहात. या निर्णयामुळे अमेरिकेस मोठ्या प्रमाणात रोजगार गमवावा लागेल. हा निर्णय तुमच्या अध्यक्षीय वचननाम्याच्या आशयाच्याही विरुद्ध आहे...

वॉशिंग्टन - अमेरिकेतील अब्जावधी डॉलर्स किंमतीच्या वादग्रस्त किस्टोन तेलवाहिनीच्या निर्मितीसाठी भारतीय पोलाद वापरण्यात येऊ नये, असे आवाहन अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाच्या एका प्रभावी गटाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याक्कडे केले आहे. या गटामध्ये 9 सिनेटर्सचा समावेश आहे.

"किस्टोन तेलवाहिनीसाठी पूर्णत: अमेरिकन बनावटीचे पोलाद वापरले जाणार नाही, असे कळल्याने आमची निराशा झाली. याचबरोबर, या तेलवाहिनीची बांधणी करणाऱ्या कॅनडाच्या कंपनीस परदेशांतील, विशेषत: भारत व इटलीसारख्या देशांमधील पोलाद वापरण्याची परवानगी देऊन आपण चुकीचा पायंडा पाडत आहात. भारत व इटली या देशांनी अमेरिकन बाजारपेठेमध्ये पोलाद मोठ्या प्रमाणात (डम्प) व अवैध किंमतीत विकले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेस मोठ्या प्रमाणात रोजगार गमवावा लागेल. हा निर्णय तुमच्या अध्यक्षीय वचननाम्याच्या आशयाच्याही विरुद्ध आहे. "बाय अमेरिकन' या तुमच्या धोरणामध्ये या तेलवाहिनीचा समावेश नसल्याने आम्हाला दु:ख झाले आहे,'' असे या गटाने ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

सिनेटर्स ख्रिस व्हान होलेन आणि टॅमी डकवर्थ हे या गटाचे नेतृत्व करत आहेत. या प्रकल्पाची किंमत एकूण 8 अब्ज डॉलर्स असून ट्रान्सकॅनडा कंपनी या प्रकल्पाची निर्मिती करत आहेत. सिनेटर्सच्या या गटासहच काही पर्यावरणवादी गटांनीही ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर, आता ट्रम्प यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे.

Web Title: Don't use steel from India - Senators