
Earthquake : अफगाणिस्तानमध्ये तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप, पापुआ न्यू गिनी आणि जपानमध्ये जोरदार हादरे
Papua New Guinea Earthquake : रविवारी रात्री उशिरा भूकंपाच्या धक्क्याने भारताच्या शेजारील भाग हादरला आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, रविवारी पहाटे 2:14 वाजता अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 273 किमी पूर्व ईशान्येस भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 मोजली गेली.
दुसरीकडे, पापुआ न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन भागात जमीन हादरल्याने लोक घाबरले होते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी मोजली गेली. आतापर्यंत कोणतेही नुकसान झाले नसले तरी भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी जपानच्या होक्काइडो बेटाच्या पूर्वेकडील भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
गेल्या महिनाभरात तुर्की, सीरिया, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, भारत यासह जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे पन्नास हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
याआधी गुरुवारी तुर्की, अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कस्तानमधील लोक दहशतीखाली जीवन जगत आहेत. तुर्कस्तानमध्ये 6 फेब्रुवारीला झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेली हानी कधीच भरून निघू शकत नाही.
भूकंपातील मृतांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. लाखो लोक जखमी झाले. लाखो इमारती जमीनदोस्त झाल्या. लाखो लोक बेघर झाले आहेत.