'डेटा लीक'चा इक्वेडोरला फटका

पीटीआय
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

इक्वेडोरमधील सुमारे 1.70 कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन लीक झाली असून, त्यात सुमारे 70 लाख लहान आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती, फोन क्रमांक आणि राष्ट्रीय ओळखपत्रांचे क्रमांक आदींची माहिती एका खासगी कंपनीच्या असुरक्षित सर्व्हरवर आढळून आल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे.

क्विटो - इक्वेडोर देशातील जवळजवळ सर्वच नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश असलेला डेटा लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इक्वेडोरमधील सुमारे 1.70 कोटी नागरिकांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन लीक झाली असून, त्यात सुमारे 70 लाख लहान आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती, फोन क्रमांक आणि राष्ट्रीय ओळखपत्रांचे क्रमांक आदींची माहिती एका खासगी कंपनीच्या असुरक्षित सर्व्हरवर आढळून आल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे.

ही अतिशय नाजूक आणि गंभीर घटना असून, हा सरकारसाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री मारिया पॅउला रोमो यांनी दिली आहे. इक्वेडोरशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती ऑनलाइन लीक झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे रोमो यांनी म्हटले आहे.

इक्वेडोरचे अध्यक्ष आणि त्या देशात राजकीय आश्रय घेतलेले विकिलिक्‍सचे संस्थापक ज्युलियन असांजे यांच्याबाबतची माहितीही उघड झाल्याचे समजते. ऑनलाइन लीक झालेली सर्व माहिती सुरक्षित करण्यासाठी इक्वेडोरच्या सरकारी संस्थांनी सायबर सुरक्षा क्षेत्रातील कंपनीशी संपर्क साधला आहे, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. झेडनेट या सायबर सुरक्षाविषयक संकेतस्थळाने प्रथम याबाबतचे वृत्त दिले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ecuador Loss by Data Lick