आवड व क्षमतांनुसार शिक्षण द्यावे - प्रतापराव पवार

आवड व क्षमतांनुसार शिक्षण द्यावे - प्रतापराव पवार

मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज केले. 

सकाळ माध्यम समूहाच्या ‘एज्युकॉन २०१८’ या परिषदेचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते आज येथे झाले. आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे व बेनेट विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर व्यासपीठावर होते. देशभरातील शिक्षण, उद्योग, आरोग्य, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, कायदा आदी विविध विषयांशी संबंधित संस्थांचे पदाधिकारी, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, माजी कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ आदींनी या दोन दिवसांच्या परिषदेत सहभाग घेतला आहे. 

पवार यांनी कोडॅक कंपनीचे उदाहरण देत नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम ‘कोडॅक’ कंपनी संपण्यात कसा झाला, याची सत्यता विशद केली. सृजनशील तंत्रज्ञानामुळे ॲमेझॉन व गुगलसारख्या कंपन्या आल्या आहेत. ग्राहकाला हवे ते थेट दारात नेऊन देण्याची त्यांची कार्यपद्धती भावत आहे. त्याच धर्तीवर आता विद्यार्थ्यांना नेमके काय हवे, याचा वेध घेऊन तसे शिक्षण व मार्गदर्शन देण्याचे धोरण उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत संस्थांना राबवावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, ‘‘पुढील काळात ‘गेम चेंजिंग सिनॅरिओ’ आहे. तरुण पिढी ही ॲसेट आहे. मोठ्या समस्या व आव्हाने याच खऱ्या संधी असतात. आगामी काळात सखोल संशोधन व ज्ञानाचे आदान-प्रदान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी समाजातल्या परिवर्तनाची नांदी विचारात घेऊन उच्च शिक्षणातही परिवर्तनाची गरज आहे.’’

डॉ. धांडे यांनी उदाहरणे देत शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या बदलाची माहिती दिली. संस्थांनी बारा महत्त्वाच्या बाबी विचारात घेऊन आपली कुंडली मांडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. सध्या उच्च शिक्षण खूप संकुचित होत चालले आहे. ही परिस्थिती बदलून चार पायांवर उभे राहणारे शिक्षण नव्या पिढीला द्यायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. शेवगावकर यांनी भविष्यात समाज व तंत्रज्ञान कसे पुढे जाणार आहे, याचा आलेख मांडला. तंत्रज्ञान व कला यांचा संगम उच्च शिक्षणात होण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. 

‘एज्युकॉन’च्या माध्यमातून जगभरातील शिक्षण क्षेत्राची चर्चा होते. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांना नवी दिशा मिळते. त्याचा परिणाम शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी करता येतो. 
- अमित कोल्हे, कार्यकारी विश्‍वस्त, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, कोपरगाव, जि. नगर. 

विविध विषयांवरील मार्गदर्शन, चर्चा व संवादामुळे ‘एज्युकॉन’ पथदर्शी ठरत आहे. परिषदेतील विविध पैलूंचा ऊहापोह व उच्च शिक्षणातील विविध घटकांचा सहभाग उत्साहवर्धक आहे.
- डॉ. विवेक सावजी, कुलगुरू, के. एल. ई. विद्यापीठ, बेळगाव

‘एज्युकॉन’मध्ये विविध क्षेत्रांतील मंडळींच्या विचारांचे आदान-प्रदान होते. त्याचा उपयोग उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी निश्‍चित होईल, याची खात्री वाटते. 
- डॉ. सोमनाथ पाटील, सचिव, डी. वाय. पाटील विद्यापीठ व युनिटेक सोसायटी, पिंपरी, पुणे

भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून ‘रोडमॅप’ मिळतो. त्याचा उपयोग ग्रामीण भागात अत्याधुनिक शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी नक्की होईल.
- डॉ. संजय चव्हाण, संचालक, एसजीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, महागाव, जि. कोल्हापूर

गेल्या पाच वर्षांच्या शिक्षण पद्धतीचा आढावा व पुढील पन्नास वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात काय होईल याची माहिती ‘एज्युकॉन’मध्ये मिळत आहे. त्याचा फायदा थेट विद्यार्थ्यांना करून देता येणार आहे.
- प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, पुणे 

सकाळ माध्यम समूहाच्या ‘एज्युकॉन’मध्ये विविध स्तरांवरील उच्च शिक्षणाची चर्चा होते. त्याचा मोठा उपयोग होतो. गेली १३ वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे, याचे कौतुक वाटते. 
- विनायक देशमुख, सहसचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई, जि. नगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com