'शिक्षण व उद्योगांनी एकत्र काम करावे'

बुधवार, 25 सप्टेंबर 2019

‘‘विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळविण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण करायला हवी. त्यासाठी शिक्षण व उद्योगजगताने एकत्रित काम करणे गरजेचे आहे. या दोन्ही क्षेत्रांनी हातात हात घालून काम केल्यास विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळेल. परिणामी, त्यांच्यातील कौशल्यविकासाला चालना मिळेल,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

टोकियो (जपान) -  ‘‘विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान मिळविण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण करायला हवी. त्यासाठी शिक्षण व उद्योगजगताने एकत्रित काम करणे गरजेचे आहे. या दोन्ही क्षेत्रांनी हातात हात घालून काम केल्यास विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन मिळेल. परिणामी, त्यांच्यातील कौशल्यविकासाला चालना मिळेल,’’ असे प्रतिपादन ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या पुढाकाराने येथे आयोजित ‘एज्युकॉन २०१९’ या दोनदिवसीय शिक्षण परिषदेचे उद्‌घाटन मंगळवारी पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. देशभरातून आलेले शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, व्यावसायिक, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

पवार म्हणाले, ‘‘पारंपरिक व केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा आता कौशल्यावर आधारित शिक्षणाची खरी गरज आहे. कौशल्यावर आधारित शिक्षणासंदर्भात आपण पुढे जायला हवे. पुढच्या पिढीला आपण कोणत्या प्रकारचे कौशल्य शिक्षण देणार आहोत, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. कौशल्य व शिक्षणाच्या बळावर  मलेशियासारखा देश विकासात भारताच्या पाचपट पुढे गेला. शिक्षण संस्थांना स्वायत्तता दिल्यास खूप चांगले परिणाम दिसतात. सरकारच्या आर्थिक व प्रशासकीय नियंत्रणात काम करीत असतानाही गुणवत्तेत वेगळेपण जपणारे पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे त्याचे उदाहरण आहे.’’

‘‘जगभर ‘गणित’ या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येत असताना भारतात मात्र गणिताकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. थिअरीसाठी विद्यार्थ्यांना ‘गुगल’ व ‘मुक्‍स’सारखे पर्याय उपलब्ध आहेत. कोणताही बदल ताण देणारा असतो. बहुतांश शिक्षक पन्नाशीच्या पुढचे असून, त्यांना बदलत्या शिक्षणाचा ताण सहन होत नाही. त्यामुळे निर्णय घेणारेच ताण घेऊ शकले नाहीत, तर पुढच्या पिढीचे नुकसान होईल,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणेचे संचालक डॉ. भारतकुमार आहुजा यांनी, प्रतापराव पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘एज्युकॉन’च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नव्या प्रणालींची ओळख शिक्षण संस्थांना झाल्याचे सांगितले. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. संजय धांडे यांनी, ‘एज्युकॉन’मुळे शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची मनोवृत्ती बदलण्यास मदत झाल्याचे सांगितले.

जपानमधील टोकियो विद्यापीठातील प्राध्यापक योसिनो हिरोशी, साइटामा विद्यापीठातील प्राध्यापक नौमुरा, ‘जपान सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी’चे डॉ. निशिकामा व ‘एससीसीआयपी’ जपान या कंपनीचे अध्यक्ष रेन्या किकुची यांनी कौशल्य, शिक्षण, तंत्रज्ञान व देवाणघेवाण यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

‘उद्योगातील अनुभव ज्ञानदानासाठी उपयुक्त’
प्रतापराव पवार म्हणाले की, ‘क्रिटिकल थिंकिंग’, ‘कम्युनिकेशन’, ‘कोलॅबोरेशन’ व ‘क्रिएटिव्हिटी’ या चतु:सूत्रीचा अवलंब केल्यास सर्वांगीण प्रगतीला चालना मिळू शकेल. इतकेच नव्हे, तर क्रांती घडू शकेल. ‘सीएसआर’सारखे चांगले निर्णय आता होत आहेत. प्राध्यापक व विद्यार्थी एकत्र ‘रिसर्च प्रॉडक्‍ट’ घेऊ शकतात. उद्योगात दहा-बारा वर्षे अनुभव असलेली व्यक्ती सहायक प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम करू शकते. हे निर्णय आता देशपातळीवर होऊ घातले आहेत. त्यामुळे प्रगतीच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.