esakal | लवकर निवडणुकांचा प्रस्ताव विरोधकांना अमान्य 
sakal

बोलून बातमी शोधा

लवकर निवडणुकांचा प्रस्ताव विरोधकांना अमान्य 

ब्रिटनमध्ये ब्रेक्‍झिटच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्‍वभूमीवर लवकर निवडणुका घेण्याची शिफारस आज पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली.

लवकर निवडणुकांचा प्रस्ताव विरोधकांना अमान्य 

sakal_logo
By
पीटीआय

लंडन - ब्रिटनमध्ये ब्रेक्‍झिटच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्‍वभूमीवर लवकर निवडणुका घेण्याची शिफारस आज पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. मात्र, जॉन्सन यांचा प्रस्ताव विरोधकांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे जॉन्सन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

लवकर निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे आव्हान जॉन्सन यांनी विरोधी पक्षनेते जेरेमी कॉर्बीन यांना आज दिले. विरोधातील मजूर पक्ष आणि बंडखोर टोरी सदस्यांनी पाठिंबा दिल्यास ब्रिटनमध्ये 15 ऑक्‍टोबर रोजी निवडणुका घेण्याचा जॉन्सन यांचा विचार आहे. ब्रिटनच्या संसदेत आज यावर घणाघाती चर्चा झाली. 

लवकर निवडणुका घेण्याची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी जॉन्सन यांच्या प्रस्तावाला विरोधातील मजूर पक्ष आणि बंडखोर टोरी सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्‍यकता आहे. हा प्रस्ताव संसदेत मंजूर करण्यासाठी एक तृतीयांश बहुमत आवश्‍यक आहे. दरम्यान, जॉन्सन यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या ब्रेक्‍झिटसाठीची 31 ऑक्‍टोबरची मुदत संपेपर्यंत लवकर निवडणुकांना आम्ही पाठिंबा देणार नाही, असे विरोधी मजूर पक्षाने स्पष्ट केले आहे. 

सरकारच्या ब्रेक्‍झिटबाबतच्या धोरणांना विरोध करणार असाल तर लवकर निवडणुकीच्या प्रस्तावालाही पाठिंबा द्या, अशा शब्दांत जॉन्सन यांनी कॉर्बीन यांना ललकारले आहे. ब्रिटनच्या संसदेत आज झालेल्या चर्चेवेळी जॉन्सन यांनी लवकर निवडणुका घेण्याचे सूतोवाच केले. 

सरकारच्या ब्रेक्‍झिटबाबतच्या धोरणांच्या विरोधातील विधेयकाला कॉर्बीन हे पाठिंबा देणार असतील तर त्यांनी लवकर निवडणुका घेण्याच्या आमच्या प्रस्तावालाही पाठिंबा देण्याची हिंमत दाखवावी. कारण निवडणुकीच्या माध्यमातूनच ब्रेक्‍झिटबाबतचे मत मांडण्याची संधी देशातील जनतेला मिळू शकते, असे जॉन्सन म्हणाले. टोरी खासदारांनी पाठिंबा काढल्यामुळे जॉन्सन यांचे सरकार अल्प मतात आले आहे. 

loading image
go to top