
त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त होणारा शब्द हा 'परिसशब्द' ठरतो.
नवी दिल्ली : 'बड्डे लोगों की बड्डी-बड्डी बातें' असं म्हणतात ते काही उगीच नाही. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्कला ओळखलं जातं. जगातील सर्वांत मोठी इलेक्ट्रीक वाहन कंपनीचा मस्क हा मालक आहे. शिवाय नानाविध कारणांनी एलॉन सतत चर्चेत असतो. त्याचं साधं एक ट्विटसुद्धा भल्याभल्याचं आयुष्य बदलवून टाकणारं ठरतं. त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त होणारा शब्द हा 'परिसशब्द' ठरतो.
Bought a hand knit wool Marvin the Martian helm for my dog
— Elon Musk (@elonmusk) January 26, 2021
आता त्याचं असंच एक ट्विट चर्चेचा विषय ठरलंय. तसेच ते चक्क शेअर बाजारात उलथापालथ करणारं ठरलं आहे. एलॉन मस्कने काल मंगळवारी ‘I kinda love Etsy’ असं ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये Etsy हा शब्द असल्याने या नावाच्या कंपनीला बराच फायदा झाल्याचे दिसून आले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 10 टक्क्यांनी उसळी घेतलेली दिसून आली. मस्क यांनी खरेतर दोन ट्विट्स केले होते. यातील पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी ‘I kinda love Etsy’ असं म्हटलं होतं. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी ‘Etsy’ वरुन माझ्या पाळीव कुत्र्यासाठी लोकरापासून हातांनी विणलेले मार्विन द मार्टियन हेल्म विकत घेतले, असं म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटमुळे या Etsy कंपनीची तर लॉटरीच लागली. नशीब फळफळणे ज्याला म्हणतात, त्या वाक्याचा या कंपनीला पुरेपुर प्रत्यय आला. शेअर मार्केट सुरु होताच या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली. या कंपनीची गेल्या 12 महिन्यांतील ही सर्वांत मोठी तेजी होती. Etsy ही एक इ-कॉमर्स साईट आहे. त्यावर विविध प्रकारचे हातांनी बनवलेले प्रोडक्ट्स मिळतात.
हेही वाचा - पाकिस्तानमध्ये हिंदू आणि मंदिरांचं अस्तित्व धोक्यात; दिवसेंदिवस होतेय घट
एलॉन मस्क यांच्याबाबत घडलेली ही काही पहिलीच घटना नाहीये. अलिकडेच व्हॉट्सएप कंपनीने आपल्या प्रायव्हसीच्या धोरणात जाहीर केलेल्या बदलांमुळे व्हॉट्सएपभोवती शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावेळी एलॉन मस्क यांनी आता 'सिग्नल वापरा' असं ट्विट केलं होतं. यानंतर सिग्नल या ऍपचे युझर्स तर झपाट्याने वाढलेच शिवाय त्यांच्याही शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होऊन त्या कंपनीला अभूतपूर्व फायदा झाला. फक्त याच कंपनीला नव्हे तर अनेकांचा सिग्नल शब्दावरुन गोंधळ उडाल्याने सिग्नल ऍडव्हान्स इंक नावाच्या टेक्सासमधील एका छोट्या कंपनीला देखील फायदा होऊन त्यांचे शेअर्स देखील वाढलेले दिसून आले.