मुशर्रफ यांची "महाआघाडी' फुटली 

esakal marathi news pervez musharraf news
esakal marathi news pervez musharraf news

इस्लामाबाद (पीटीआय) : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांनी केलेली महाआघाडीची घोषणा दुसऱ्याच दिवशी फोल ठरली. मुशर्रफ यांनी शुक्रवारी दुबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 23 राजकीय पक्षांच्या महाआघाडीची घोषणा केली होती. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन महत्त्वाच्या पक्षांनी आपण महाआघाडीचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट करत मुशर्रफ यांना धक्का दिला.

पाकिस्तान अवामी तेहरिक (पीएटी) आणि मजलीस वाहदते मुस्लिमीन (एमडब्ल्यूएम) या दोन मोठ्या पक्षांनी आपण महाआघाडीत सहभागी नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानातील काही माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. 
परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आलेलेल्यांच्या यादीतून नाव हटविण्यात आल्यानंतर मुशर्रफ हे मागील वर्षी मार्चमध्ये दुबईला गेले होते. तेव्हापासून ते दुबईतच वास्तव्याला आहेत. स्वतः मुहाजिर असलेल्या मुशर्रफ यांनी सर्व मुहाजिर समुदायाला एकत्र येण्याचे आव्हान करत महाआघाडीची घोषणा केली होती. फाळणीवेळी भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुख्यत्वे उर्दू बोलणाऱ्या नागरिकांना मुहाजिर म्हणून ओळखले जाते. मुहाजिर समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आव्हान करत पाकिस्तान अवामी इत्तेहाद नावाने महाआघाडी स्थापन करण्यात आल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. ते स्वतः या आघाडीचे प्रमुख असून, इक्‍बाल दर यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

मोठ्या पक्षांनी घेतली फारकत 
अशा प्रकारची महाआघाडी स्थापन करण्यासाठी आमच्या कोणीही चर्चा केलेली नाही किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांनी यासाठीच्या कुठल्याही राजकीय बैठकीला हजेरी लावलेली नाही, अशी प्रतिक्रिया "एमडब्ल्यूएम'च्या नेत्यांनी व्यक्त केल्याचे वृत्तात म्हटले आहे. पीएटीनेही कालच आपण महाआघाडीत नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, सुन्नी इत्तेहाद परिषदेचे अध्यक्ष असलेल्या साहिबजादा हमिद रझा यांनी अवामी इत्तेहात आघाडी ही निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेली नाही, असे म्हटले होते. 

पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख राहिलेल्या मुशर्रफ यांनी पाच वर्षांचा विजनवास संपवून पाकिस्तान परत येत 2013मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुशर्रफ यांच्या विरोधात न्यायालयात अनेक खटले सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com