ट्रम्पविरोधात साक्ष देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी

पीटीआय
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

लेफ्टनंट कर्नल व्हिंडमन यांना पदावरून का हटविण्यात आले आहे, हे साऱ्या अमेरिकेला ठाऊक आहे. मात्र, त्यामुळे व्हाइट हाउसच्या सेवेतील एक प्रामाणिक सैनिक कमी झाला आहे.
- डेव्हिड प्रेसमन, व्हिंडमन यांचे वकील

वॉशिंग्टन - महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधिगृहाच्या समितीसमोर साक्ष दिलेल्या दोन अधिकाऱ्यांची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर हकालपट्टी केली आहे. सिनेटमध्ये बहुमताच्या जोरावर ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाचा प्रस्ताव रद्द करीत ट्रम्प यांच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांच्या वकिलांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे युरोपियन महासंघातील (ईयू) राजदूत गॉर्डन सॉँडलॅंड आणि व्हाइट हाउसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील युक्रेन विषयातील तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल अलेक्झॅंडर व्हिंडमन या दोघांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान संसदीय समितीसमोर साक्ष दिली होती. अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोगाच्या प्रक्रियेच्या सुनावणीवेळी या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेली साक्ष प्रतिनिधिगृहात अत्यंत महत्त्वाची ठरली होती. त्यामुळेच ट्रम्प यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचे सांगितले जाते.

चीनमध्ये कोरोनाग्रस्त संशयितांची धरपकड; परिस्थिती हाताबाहेर

अमेरिकेचे युरोपियन महासंघातील (ईयू) राजदूत या पदावरून आपल्याला तातडीने हटविण्याचे आदेश अध्यक्षांनी दिल्याचे आपल्याला सांगण्यात आले, अशी माहिती सॉँडलॅंड यांनी निवेदनाद्वारे दिली. तर दुसरे अधिकारी व्हिंडमन यांना व्हाइट हाउसमधून सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाहेर काढले. प्रतिनिधिगृहातील सुनावणीवेळी सत्य कथन केल्याबद्दल लेफ्टनंट कर्नल व्हिंडमन यांना तातडीने पद सोडण्यास सांगण्यात आले, असा दावा त्यांचे वकिलाने केला. दरम्यान, दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देण्यास व्हाइट हाउसने नकार दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The expulsion of two officials testifying against Trump