रेक्‍स टिलेर्सन होणार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

टिलेर्सन (वय 64) यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवेदनशील चर्चांचा मोठा अनुभव असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी त्यांचे उत्तम व्यावसायिक संबंध आहेत. रशियाने क्रिमिया हस्तगत केल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांस टेलर्सन यांनी स्पष्ट विरोध दर्शविला होता...

वॉशिंग्टन - "एक्‍झॉन मोबिल' कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेक्‍स टिलेर्सन यांनी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. टेलर्सन हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. या पार्श्‍वभूमीवर, टेलर्सन व ट्रम्प यांची ही भेट अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. ट्रम्प यांनी बोलताना टेलर्सन हे अमेरिकेचे पुढील परराष्ट्र मंत्री होतील, असे संकेत दिले होते.

अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघामधील राजदूत जॉन बोल्टन हे उप परराष्ट्र मंत्री जबाबदारी सांभाळणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदासाठी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मिट रॉमनी यांच्या नावाचीही चर्चा होती. याआधी, या पदासाठीच्या स्पर्धेमधून न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर रुडी गियुलिआनी यांनी माघार घेतली होती.

टिलेर्सन (वय 64) यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवेदनशील चर्चांचा मोठा अनुभव असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी त्यांचे उत्तम व्यावसायिक संबंध आहेत. रशियाने क्रिमिया हस्तगत केल्यानंतर रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांस टेलर्सन यांनी स्पष्ट विरोध दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर, त्यांची निवड अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहे.

 

Web Title: Exxon's Rex Tillerson to be USA's secretary of state?