फेसबुकने केली फोन कॅमेरातून डेटा चोरी; हेरगिरीसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचा आरोप

पीटीआय
Friday, 18 September 2020

फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे जगभरातील हजारो यूजर या प्लॅटफॉर्मवर लॉगइन करु शकले नाही. याबाबत यूजरनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. यादरम्यान फेसबुकने इन्स्टाग्रामच्या यूजरची कथित रुपाने हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यूजरचा डेटा चोरण्यासाठी फोन कॅमेराचा वापर केल्याचे म्हटले आहे. याबाबत याचिका दाखल आहे.

सॅन फ्रान्सिस्को : लोकप्रिय सोशल मीडिया फेसबुकवर इन्स्टाग्राममार्फत डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला असून यूजरचा खासगी डेटा चोरण्यासाठी फोन कॅमेराचा वापर केल्याचे म्हटले आहे. याबाबत सॅन फ्रान्सिस्कोच्या फेडरल न्यायालयात न्यू जर्सीच्या इन्स्टाग्राम यूजर ब्रिटनी कॉन्डिंटी यांनी याचिका दाखल केली आहे. फेसबुकने मात्र हा आरोप फेटाळला असून एका बगमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

इराणवरील निर्बंधांवरून अमेरिका एकाकी

गुरुवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे जगभरातील हजारो यूजर या प्लॅटफॉर्मवर लॉगइन करु शकले नाही. याबाबत यूजरनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला. यादरम्यान फेसबुकने इन्स्टाग्रामच्या यूजरची कथित रुपाने हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यूजरचा डेटा चोरण्यासाठी फोन कॅमेराचा वापर केल्याचे म्हटले आहे. याबाबत याचिका दाखल आहे.

एका वृत्तानुसार आयफोन यूजर जेव्हा इन्स्टाग्रामवर सक्रिय नव्हते, तेव्हा देखील त्यांच्या फोन कॅमरा सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. याचिकाकर्त्या ब्रिटनी कॉन्डिटी यांच्या मते, ॲपच्या कॅमेराचा उपयोग डेटा आणि महत्वपूर्ण माहिती चोरीसाठी जाणीवपूर्वक केला जातो. अन्यथा यूजर सक्रिय नसतानाही त्याचा कॅमेरा सक्रिय कशासाठी राहू शकतो, असा सवाल करण्यात आला आहे. याप्रकरणी फेसबुकने मत मांडलेले नाही.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीची अशी असते नजर
आपण जेव्हा एखाद्या ॲपला फोनमध्ये इन्स्टॉल करतो, तेव्हा ॲप सुरू होण्यापूर्वी यूजरची परवानगी मागितली जाते. त्यात कन्टेंट, मीडिया, लोकेशन, कॅमेरा आदींचा समावेश होतो. आपण कोणतेही नियम न वाचता त्यास परवानगी देतो. अशा कृतीने आपला डेटा वापरण्याची परवानगी ॲपला मिळते. अशा स्थितीत जेव्हा आपल्या फोनचा डेटा ऑन राहतो, तेव्हा ॲपमार्फत आपल्या डेटावर लक्ष ठेवले जाते. फेसबुक, इन्स्टाग्राम ॲप हे आपल्या मर्जीने डेटावर लक्ष ठेवतात. एवढेच नाही तर आपल्या परवानगीशिवाय कॅमेरा देखील वापरतात. कारण आपण यापूर्वीच परवानगी दिलेली असते.

 डेटा चोरी होण्यापासून वाचण्यासाठी टिप्स
- आवश्‍यकतेनुसारच ॲपला परवानगी द्या. इन्स्टाग्रामला केवळ कॅमरा आणि गॅलरीची परवानगी द्यावी. कॉन्टॅक्ट किंवा लोकेशनची परवानगी देण्याची गरज नाही
-जेव्हा आपण एखादा ॲप वापरतो तेव्हा तो बंद करण्याऐवजी मिनिमाइज करतो. प्रत्यक्षात आपण फोनच्या होम बटणला प्रेस करतो, तेव्हा तो ॲप लहान होऊन बॅकग्राउंडला जातो आणि तो चालू राहतो. अशावेळी ॲप आपल्या डेटावर लक्ष ठेऊ शकतात. त्यामुळे काम होताच ॲप बंद करावा.
-जर आपण इंटरनेट सतत वापरत नसाल तेव्हा फोनचा डेटा बंद करु शकता. विशेषत: रात्रीच्या वेळी डेटा बंद करायला हवा. डेटा बंद ठेवल्याने फोनचा डेटा चोरी होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Accused of Watching Instagram Users Through Cameras