'कंपनी द्वेषातून नफा कमावते'; २८ वर्षीय फेसबुक इंजिनिअरने दिला राजीनामा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 9 September 2020

सॉफ्टवेअर इंजिनिअर अशोक चांदवणे यांनी फेसबुक कंपनीतील आपली नोकरी सोडली आहे.

वॉशिंग्टन- सॉफ्टवेअर इंजिनिअर अशोक चांदवणे यांनी फेसबुक कंपनीतील आपली नोकरी सोडली आहे. फेसबुक कंपनी जगभरात द्वेष पसरवण्याच्या कामात हातभार लावत आहे. अशा संस्थेमध्ये मी काम करू शकत नाही, असं म्हणत त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशोकने कंपनीला १,३०० शब्दांचे पत्र लिहिलं आहे. यात त्याने आपण फेसबुक का सोडत आहे, याचं कारण दिलं आहे. 

फेसबुक द्वेषामधून नफा कमावत आहे. अमेरिका आणि जगभरात कंपनीकडून असं होत आहे. त्यामुळे अशा कंपनीलाचा मी एक भाग होऊ शकत नाही, असं अशोकने आपल्या पत्रात म्हटलं आहे. त्याने हे पत्र मंगळवारी फेसबुक कर्मचारी नेटवर्कवर सकाळी आठ वाजता पोस्ट केले होते. त्याने याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली होती. यात त्याने त्याच्या निर्णयाला बळ देणाऱ्या काही लिंकही शेअर केल्या आहेत. 

"कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होणे अपमानाची गोष्ट असेल...

अशोकच्या या पोस्टनंतर फेसबुकने लगेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही द्वेषामधून नफा कमवत नाही, असं फेसबुक कंपनीच्या प्रवक्त्या लिझ बुजुर्झा म्हणाल्या आहेत. आम्ही दरवर्षी अब्जावधी डॉलर समाजाच्या सुरक्षिततेसाठी खर्च करतो. शिवाय अनेक तज्ज्ञांसोबत आम्ही भागिदारी केली आहे. त्यानुसार आम्ही आमची पॉलीसी ठरवत असतो. या उन्हाळ्यात आम्ही एक पॉलीसी लॉन्च केली होती, त्यानुसार फॅक्ट चेकींग कार्यक्रम हाती घेण्यात आला. आम्ही आतापर्यंत लाखो द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट काढून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे रिपोर्ट होण्याआधीच आम्ही ९६ टक्के पोस्ट काढून टाकल्या होत्या, असंही त्या म्हणाले आहेत.  

फेसबुक प्रकरणी सध्या असंतोष वाढत आहे. त्यातच अशोक चांदवणे या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्याने याबाबत चर्चा सुरु झाली आहे. फेसबुक कंपनीमध्ये एकूण किती इंजिनिअर काम करतात, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, फेसबुक आपल्या कर्चाऱ्यांना मोठ्या रकमेचा पगार देतो, असं फेसबुकच्या संबंधितांनी सांगितलं. 

देशात कोरोनाचा कहर थांबता थांबेना; आतापर्यंत महाराष्ट्रात दगावले सर्वाधिक रुग्ण

२८ वर्षीय चांदवणेने फेसबुकमध्ये काम करण्याचे वातावरण चांगले असल्याचं म्हटलं आहे. मात्र, काही काळानंतर कंपनी नफा कमवण्यासाठी काय करत आहे, ते समोर आलं. फेसबुकच्या व्यासपीठावरुन वंशविद्वेष, चुकीची माहिती आणि हिंसा अशा गोष्टींना प्रोत्साहन दिल जात आहे. मात्र, कंपनी यावर काहीही कारवाई करताना दिसत नाही, असं तो म्हणाला आहे. अशोकने विशेष करुन म्यानमारमधील नरसंहार, अमेरिकेतील केनोशा येथील हिंसेचा उल्लेख केला आहे. केनोशा प्रकरणात फेसबुकवरुन शस्त्र हाती घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी फेसबुकने ही पोस्ट काढण्यास वेळ लावला होता. 

(EDITED BY- KARTIK PUJARI)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Engineer Quits Says Company Profiting Off Hate