
Meta Layoffs : फेसबुक - व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी 'मेटा' पुन्हा १०,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी असलेल्या मेटाने कर्मचाऱ्यांना नारळ दिले आहे. मेटा आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरून सुमारे १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. यापूर्वी, कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
कोरोनाच्या काळात कंपनीने २०२० पासून जबरदस्त नोकरभरती केली होती. या नियुक्तीनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली होती. दरम्यान लिंक्डइनच्या माध्यमातून कंपनीने कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय कळवला आहे. यामध्ये जाहिरात, विपणन आणि पार्टनरशिप टीमधील कर्मऱ्यांचा समावेश असेल.
२०२२ मध्ये मेटाने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीच्या महसुलात घट झाल्यानंतर कंपनीने ही कारवाई केली होती.
मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले होते की, मी मेटाच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णय घेत आहे. मी माझ्या टीमचा सुमारे १३% भाग कमी करण्याचा आणि आमच्या ११,००० हून अधिक प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कंपनीमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक आर्थिक संकट, वाढते व्याजदर आणि नियामक आव्हाने यामुळे अलीकडच्या काळात अल्फाबेट आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरनेही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे.