ब्रिटनमधील वृत्तपत्रांत फेसबुकचा माफीनामा 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

झुकेरबर्ग यांनी गेल्या आठवड्यात जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करत यूजरच्या माहितीच्या गैरवापरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. या जाहिरातीत माहितीचा गैरवापर करणाऱ्या केंब्रिज ऍनालिटिका या कंपनीचा उल्लेख नाही.

लंडन : ब्रिटनमधील जवळपास सर्वच राष्ट्रीय वृत्तपत्रांत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी रविवारी पूर्ण पान जाहिरातींद्वारे माफीनामा प्रसिद्ध केला आहे. 

या माफीनाम्यात म्हटले आहे, की तुमच्या माहितीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. हे जर आम्हाला करता येत नसेल, तर आम्ही अपात्र ठरत आहोत. तुमचा विश्‍वास आम्ही तोडला असून, याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे असे घडणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. फेसबुकने नियम बदलले असून, यापुढे तुमची व्यक्तिगत माहिती बाहेर जाणार नाही. 

झुकेरबर्ग यांनी गेल्या आठवड्यात जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करत यूजरच्या माहितीच्या गैरवापरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. या जाहिरातीत माहितीचा गैरवापर करणाऱ्या केंब्रिज ऍनालिटिका या कंपनीचा उल्लेख नाही. तसेच जाहिरातीत म्हटले आहे, की मोठ्या प्रमाणात डेटाचा ऍक्‍सेस असलेल्या सर्व ऍपची तपासणी करण्यात येत आहे. अशी ऍप शोधून बंद करण्यात येतील आणि त्याची माहिती जाहीर करण्यात येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebooks Mark Zuckerberg says sorry to US UK with newspaper ads