पाकची कोल्हेकुई

पीटीआय
गुरुवार, 25 मे 2017

पाकचा व्हिडिओ बनावट : भारत
पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्‍यांचे नुकसान केल्यासंदर्भात जारी केलेला व्हिडिओ बनावट असल्याचे भारतीय लष्करातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. भारतीय चौक्‍यांच्या भिंती बंदुकीच्या गोळा रोखण्यासाठी पुरेशा मजबूत आहेत, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सियाचीनमध्ये भारतीय हवाई हद्दीचा कोणताही भंग झाला नसल्याचे भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

इस्लामाबाद : भारतीय लष्कराने राजौरीतील नौशेरा सेक्‍टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्याचे जाहीर केल्यापासून सैरभैर झालेल्या पाकिस्तानने आम्हीही जशास तसे उत्तर देत असल्याचा बनाव रचत कोल्हेकुई सुरू केली आहे. सियाचीन भागात लढाऊ विमानांच्या उड्डाणाचा दावा केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय चौक्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा एक कथित व्हिडिओही जारी केला आहे. भारताने हे दोन्ही दावे फेटाळून लावले आहेत.

सियाचीनमध्ये लढाऊ विमाने
पाकच्या लढाऊ विमानांनी आज सकाळी सियाचीन भागात घिरट्या घातल्याचे वृत्त आज प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर भारताच्या हवाई हद्दीचा कोणताही भंग झाला नसल्याचे भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. भारतावर दबाव आणण्याची खेळी म्हणून पाकच्या या दाव्याकडे पाहिले जात आहे.
पाकिस्तान हवाई दलाच्या (पीएएफ) लढाऊ विमानांनी आज सकाळी सियाचीन भागात उड्डाण केल्याचे वृत्त समा टीव्हीने दिले. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे, की पीएएफच्या सर्व आघाडीच्या हवाई तळांना पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. हवाई तळ सज्ज ठेवण्यात आल्यानंतर पीएएफच्या विमानांचे उड्डाण म्हणजे सरावाचा एक भाग असल्याचेही म्हटले आहे.

नवी दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले, की भारताच्या हवाई हद्दीचा कोणताही भंग झालेला नाही. या महिन्याच्या सुरवातीला नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याची घोषणा भारतीय हवाई दलाने केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वृत्त आले आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमान यांनी आज स्कार्दूस्थित हवाई तळाचा दौरा केला आणि एक मिराज विमान उडविले. पीएएफच्या म्हणण्यानुसार, अमान यांनी वैमानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. लढाऊ विमानांच्या एका तुकडीने उंचावर तसेच कमी उंचीवर विमाने उडविली.
सियाचीन हा सर्वाधिक उंचीवरील युद्धक्षेत्र आहे. हा भाग हिमालय पर्वताच्या मालिकेत पूर्व कारकोरम रेंजस्थित आहे, ज्या ठिकाणी भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा संपते.

भारतीय चौक्‍या उडविल्याचा दावा
भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्‍यांवर कारवाई केल्याची एक ध्वनिचित्रफीत जारी केल्यानंतर जशास तशा कारवाई अंतर्गत पाकिस्तानी लष्करानेही नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करी चौक्‍यांचे कथितरीत्या मोठे नुकसान होत असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ जारी केला आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल असिफ गफूर यांनी लष्कराच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओसमवेत भारताने 13 मे रोजी निरपराध नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप करणारे वक्तव्य टाकले आहे. त्यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानी सैन्याने चोख प्रत्युत्तर देताना नौशेरा सेक्‍टरमध्ये भारतीय चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्या. हा कथित व्हिडिओ 87 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये भारताच्या अनेक चौक्‍या पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाल्याचे दाखविण्यात आले आहे.
दोन जवानांचे शिर कापल्यानंतर काही दिवसांतच केलेल्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या अनेक चौक्‍या उडविल्याचा दावा करत भारतीय लष्कराने मंगळवारी एक व्हिडिओ जारी केला होता. पाकिस्तानने मात्र हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते.

हवाई दल प्रमुखांची दर्पोक्ती
शत्रूच्या कोणत्याही आक्रमणांना आम्ही असे प्रत्युत्तर देऊ, की त्यांची भविष्यातील पिढीही ते लक्षात ठेवेल, अशी दर्पोक्ती पाकिस्तान हवाई दलाच्या प्रमुखांनी आज केली. रेडिओ पाकिस्तानने हे वृत्त दिले. स्कार्दू येथील कादरी हवाई तळावर पत्रकारांशी बोलताना एअर चीफ मार्शल सोहेल अमान म्हणाले, की शत्रूच्या वक्तव्याची पाकिस्तान कोणतीही दखल घेत नाही. शत्रूकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला आम्ही दिलेले प्रत्युत्तर त्यांच्या भावी पिढीच्याही लक्षात राहील.

Web Title: with fake video pakistan claims retaliating india's attack