दोनशे तीन मुलांच्या पित्याचे नायजेरियात निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 जानेवारी 2017

अबुजा (नायजेरिया) : तब्बल 130 वेळा विवाह केलेल्या आणि 203 अपत्यांचे पितृत्व असलेले येथील मुस्लिम धर्मगुरू महंमद बेलो अबुबाकर (वय 93) यांचे नुकतेच अज्ञात आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला हजारो नागरिक जमा झाले होते.

अबुजा (नायजेरिया) : तब्बल 130 वेळा विवाह केलेल्या आणि 203 अपत्यांचे पितृत्व असलेले येथील मुस्लिम धर्मगुरू महंमद बेलो अबुबाकर (वय 93) यांचे नुकतेच अज्ञात आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला हजारो नागरिक जमा झाले होते.

अनेक वेळा विवाह केल्यामुळे अबुबाकर हे त्यांच्या भागात प्रसिद्ध होते. इस्लाममध्ये चार जणींशी विवाह करण्याची परवानी असताना त्यांनी हा नियम धुडकाविला होता. त्यांनी 130 जणींशी लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना 203 मुले झाली. 130 जणींपैकी दहा जणींनी घटस्फोट घेतला आहे. काही वर्षांपूर्वी येथील धर्मगुरूंनी चार सोडून इतर सर्व जणींना घटस्फोट देण्याचा आदेश अबुबाकर यांना दिला होता. मात्र, विवाह करत राहणे ही आपली "दैवी मोहीम' असल्याचे सांगत अबुबाकर यांनी हा आदेश धुडकावला होता. इतक्‍या सर्व बायकांशी संसार करण्यासाठी देवानेच क्षमता दिली आहे, असेही त्यांचे म्हणणे होते. मात्र, आपल्या या मार्गाने इतरांनी जाऊ नये, असा सल्लाही ते देत असत. अबुबाकर यांचे निधन झाले त्या वेळी त्यांच्या पत्नींपैकी काही जणी गरोदर असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

पूर्वी शिक्षक आणि नंतर धर्मोपदेशक झालेले अबुबाकर यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना ते संसार चालवत असल्याबद्दल सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. तसेच, त्यांच्या बहुतेक पत्नी त्यांच्या मुलांपेक्षाही कमी वयाच्या आहेत. विवाहासाठी आपण कधी कोणाकडे गेलो नाही, देवाच्या मर्जीमुळे त्याच माझ्याकडे चालत आल्या, असेही ते म्हणत.

Web Title: Father of 203 children, died in Nigeria