एफबीआय एजंटने केले इसिसच्या दहशतवाद्याशी लग्न...

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

ग्रीनने कस्पर्ट याच्याशी जवळिक साधण्याकरिता स्काईपसारख्या ऑनलाईन साधनांचा वापर केला होता. यानंतर सीरियाला जाण्यासाठी ती एफबीआयशी खोटे बोलल्याचेही निष्पन्न झाले आहे...

न्यूयॉर्क - अमेरिकेची सुरक्षा संस्था असलेल्या फेडरल ब्युरो ऑफ एजन्सीची (एफबीआय) महिला एजंट इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याशी लग्न करण्यासाठी अमेरिकेहून पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

डॅनियेला ग्रीन असे या एफबीआय एंजटचे नाव आहे. ग्रीनने सीरियामध्ये जाऊन डेनिस कस्पर्ट या मूळच्या जर्मन असलेल्या दहशतवाद्याशी विवाह केल्याचे स्पष्ट झाले आहे. जर्मनीमध्ये डेसो डॉग या नावाने "रॅपिंग' करत असलेल्या कस्पर्ट याने सीरियामध्ये अबु तल्हा अल-अल्मानी असे नामाभिधान धारण केले होते! 

जर्मनीमधील नागरिकांना इसिसकडे आकर्षित करणे हे कस्पर्टचे मुख्य काम होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना धमकी देणाऱ्या एका चित्रीकरणामध्येही तो दिसून आला आहे.

ग्रीनने कस्पर्ट याच्याशी जवळिक साधण्याकरिता स्काईपसारख्या ऑनलाईन साधनांचा वापर केला होता. यानंतर सीरियाला जाण्यासाठी ती एफबीआयशी खोटे बोलल्याचेही निष्पन्न झाले आहे. एफबीआयबरोबरच ग्रीनने तिच्या पतीसही फसविल्याचे स्पष्ट झाले आहे. कस्पर्ट याला भेटावयास जाणाऱ्या ग्रीनने तिच्या अमेरिकन पतीस ती तिच्या पालकांना भेटावयास म्युनिक येथे जात असल्याचे सांगितले होते. सीरियामध्ये गेल्यानंतर कस्पर्ट याच्यावर एफबीआयची नजर असल्याची माहितीही तिने त्याला दिली. 

मात्र लवकरच ग्रीनला तिची चूक कळल्यामुळे ती अमेरिकेमध्ये परत आली आहे. अमेरिकेमध्ये परतल्यानंतर तिने स्वत:च्या चुकीची कबुली दिली. ग्रीनला दोन वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

किंबहुना, ग्रीन ही अमेरिकेत परतल्यानंतर होणारी नाचक्की टाळण्याकरिता ही प्रकरणाची माहिती शक्‍य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रीनकडून अशा स्वरुपाचे कृत्य घडेल, असा पुसटसाही अंदाज आला नसल्याची भावना तिला जवळून ओळखणाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ग्रीनचा एफबीआयमध्ये समावेश करण्याआधी तिची काटेकोर तपासणी करण्यात आली होती. तरीही ही घटना घडल्याने एफबीआयची नाचक्की झाल्याचे मानले जात आहे.
'एफबीआयसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, यामध्ये कोणतीही शंका नसल्याची,' प्रतिक्रिया जॉन किर्बी या परराष्ट्र मंत्रालयाच्या माजी उच्चाधिकाऱ्याने या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

Web Title: An FBI agent fled to Syria to marry ISIS jihadi