पाकिस्तानमध्ये झळकला भारतीय 'फ्रिकी अली'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

लाहोर : भारतीय चित्रपटांवरील बंदी मागे घेतल्यानंतर सोमवारपासून पाकिस्तानच्या चित्रपटगृहांत "फ्रिकी अली' हा पहिला चित्रपट झळकला.

लाहोर : भारतीय चित्रपटांवरील बंदी मागे घेतल्यानंतर सोमवारपासून पाकिस्तानच्या चित्रपटगृहांत "फ्रिकी अली' हा पहिला चित्रपट झळकला.
भारतातील उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय चित्रपट निर्मात्यांनी पाकिस्तानी कलाकार व तंत्रज्ञांवर बंदी घातली. याला उत्तर म्हणून पाकिस्तानमधील वितरक व चित्रपटगृह मालकांनी भारतीय चित्रपटांवर स्वयंघोषित बंदी घातली होती. दोन महिन्यांची ही बंदी उठविण्याचा निर्णय त्यांनी रविवारी घेतला. भारतात पूर्वीच प्रदर्शित झालेले चित्रपट आता येथे दाखविण्यात येणार आहेत. त्यानुसार सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेला "फ्रिकी अली' हा चित्रपट आज येथील चित्रपटगृहांत झळकला. विनोदी प्रेमकथा असलेल्या या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी, अरबाझ खान व ऍमी जॅक्‍सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

भारतातील नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात बुधवारी (ता.21) निर्णय घेण्यात येणार आहे, असे सेंटॉरस मार्केटिंग व कॉल सेंटरचे निरीक्षत अनिल अल्ताफ यांनी सांगितले. ""दोन महिन्यांपूर्वी आम्ही भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. भारतामध्ये पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घातली. याला हे आमचे उत्तर होते. आता वास्तव परिस्थितीकडे पाहण्याची वेळ आली आहे,'' असे मत चित्रपट वितरक संघटनेचे अध्यक्ष झोराई लशारी यांनी व्यक्त केले. भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याने पाकिस्तानमधील चित्रपटगृह मालकांचा 15 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. 100 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारतीय चित्रपटांसाठीच्या बाजारपेठेत पाकिस्तान हा जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जाते. भारताशी 1965 मध्ये झालेल्या युद्धानंतर पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली होती. 2008 मध्ये ही बंदी उठविण्यात आली आणि 43 वर्षांनी भारतीय चित्रपट येथे झळकले.

"पाकिस्तानी चित्रपटांना प्रेक्षक नाहीत'
चित्रपट निर्माते सोहेल खान म्हणाले, ""पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट दाखविण्याचा संबंध देशभक्तीशी जोडता येणार नाही. अखेर व्यवसाय हा व्यवसाय असतो, इतर गोष्टी या वेगळ्या असतात. पाकिस्तानी चित्रपट पाकिस्तानमध्येही चालत नाहीत. या चित्रपटांच्या खेळांना चित्रपटगृह रिकामी असतात, हे वास्तव नाकारून चालणार नाही.'' चित्रपट दिग्दर्शक शहजाद रफिक यांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, की माझ्या "सॅल्युट' या चित्रपटासह जे पाकिस्तानी चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत, त्यांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद िंमळालेला नाही. येथील नागरिकांनीच जणू स्थानिक चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे.

Web Title: fikri ali released in pak