लसीला विलंबामुळे जर्मनीचा इशारा

coronavirus-pfizer
coronavirus-pfizer

बर्लिन - युरोपीय महासंघाला कोरोनावरील लसीचा वेळेवर पुरवठा करण्यात अपयशी ठरल्यामुळे कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जर्मनीने रविवारी दिला.  अर्थ मंत्री पीटर अल्टमैर यांनी डिए वेल्ट या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कंपन्यांनी कराराचे पालन केले नाही असे घडले तर आम्हाला कायदेशीर कारवाईचा निर्णय घ्यावा लागेल.

अॅस्ट्राझेनेका कंपनीचा ठरलेल्या लसीचा पुरवठा उशिरा होत आहे. त्यामुळे ही ब्रिटिश-स्वीडिश कंपनी तसेच युरोपीय नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. परिणामी महासंघाच्या देशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशावेळी जर्मनीचे प्रमुख अधिकारी विलंबातील समस्या दूर व्हाव्यात म्हणून औषध उत्पादकांना भेटून चर्चा करण्याची अपेक्षा आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ठरलेल्या प्रमाणाच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश डोसचा पुरवठा करू शकू असे अॅस्ट्राझेनेकाने जाहीर केले आहे. युरोपमधील एका फॅक्टरीमध्ये काही समस्या निर्माण झाल्याचे कारण देण्यात आले आहे.

युरोपीय महासंघाच्या युरोपीय औषध संस्थेने शुक्रवारीच अॅस्ट्राझेनेका लसीला मंजुरी दिली. फायझर-बायोएन््टेक आणि मॉडर्ना यांच्यानंतर मान्यता मिळालेली ही तिसरी लस आहे.

ब्रेक्झीट कराराच्या काही अटींचा भंग करून युरोपीय महासंघाने उत्तर आयर्लंडला होणारी लसीची निर्यात रोखण्याचा इशारा दिला होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी याबद्दल गंभीर चिंता वाटत असल्याचे वक्तव्य करताच हे पाऊल मागे टाकण्यात आले. ब्रेक्झीटनुसार आयरिश सीमेवरून मोफत मालवाहतूक करणे ब्रिटनला शक्य होते.

कंपन्यांचा युक्तीवाद
युरोपीय महासंघाने लसउत्पादक कंपन्यांशी आधीच करार केले आहेत. त्याचे पालन झाले नाही तर लस निर्यातीवर निर्बंध घालण्याचा अधिकार या कराराद्वारे मिळाला आहे. ही पारदर्शकता असल्याचा त्यांचा दावा आहे. त्याचवेळी आमच्या नागरिकांच्या रक्षणास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्याच्या आव्हानांमुळे कोणताही पर्याय उरलेला नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

ब्रिटनकडे रोख
कोणतीही कंपनी युरोपीय महासंघापेक्षा इतर एखाद्या देशाला झुकते माप देऊ शकत नाही, असेही अल्टमैर यांनी नमूद केले. त्यांचा रोख ब्रिटनकडे होता. युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडला आहे. लसीचा पुरवठा करण्यात युरोपीय महासंघाऐवजी ब्रिटनला झुकते माप देत असल्याचा ठपका महासंघाने अॅस्ट्राझेनेकावर ठेवला आहे.

फायझरलाही इशारा
टीकेचा भडिमार होत असलेली अॅस्ट्राझेनेका ही एकमेव कंपनी नाही. गेल्याच आठवड्यात इटलीकडून फायझर या अमेरिकी कंपनीला इशारा देण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com