पनामा पेपर्सप्रकरणी पहिला अहवाल सादर

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

या यादीमध्ये शरीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे नाव असल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये शरीफ यांच्याविरोधात खटला सुरू आहे. तपास पथकाने आज सादर केलेल्या अहवालाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. हा अहवाल सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही.

इस्लामाबाद : पनामा पेपर्स गैरव्यवहारप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात सुरू असलेल्या चौकशीचा पहिला पाक्षिक अहवाल तपास पथकाने आज सर्वोच्च न्यायालयात सादर केला. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्व तपास संस्थांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मिळून संयुक्त तपास पथक नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची लंडन येथे बेनामी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. विदेशांमध्ये अशा प्रकारची बेनामी मालमत्ता असलेल्या जगभरातील अनेक नेत्यांची आणि प्रसिद्ध व्यक्तींची यादी पनामा पेपर्स या कंपनीने उघड केली होती. या यादीमध्ये शरीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे नाव असल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये शरीफ यांच्याविरोधात खटला सुरू आहे. तपास पथकाने आज सादर केलेल्या अहवालाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. हा अहवाल सार्वजनिकरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने 20 एप्रिलला दिलेल्या आदेशानुसार तपास पथकाने साठ दिवसांत चौकशी पूर्ण करायची असून दर पंधरा दिवसाला तपासातील प्रगतीचा अहवाल सादर करायचा आहे. तपास पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचेही न्यायालयाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. या तपास पथकाने अद्याप शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केलेली नाही.

Web Title: first report on panama papers presented