फ्रान्समध्ये शाळेत गोळीबार;लेटरबॉंबचा स्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

फ्रान्समधील अध्यक्षीय निवडणूक आता केवळ सहा आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील सुरक्षा दले या घटनांमागील प्रत्येक शक्‍यतेची कसून तपासणी करत आहेत

पॅरिस - दक्षिण फ्रान्समधील ग्रास या छोट्या शहरामधील एका शाळेमध्ये गोळीबार करण्यात आल्यामुळे किमान दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका 17 वर्षीय विद्यार्थ्यास अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याकडे एक रायफल, दोन हॅंडगन्स आणि दोन ग्रेनेड इतका शस्त्रसाठा असल्याचे दिसून आले आहे. संशयित दहशतवादी असल्याच्या मतास सुरक्षा दलांकडून पुष्टी देण्यात आलेली नाही.

या शाळेमधील मुख्याध्यापकांवर दोन विद्यार्थ्यांनी गोळीबार केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या दोघांमधील एका विद्यार्थ्यास अटक करण्यात आली आहे; तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेमुळे भेदरलेल्या विद्यार्थ्यांनी शेजारील एका सुपरमार्केटमध्ये आश्रय घेतला. या घटनेनंतर ग्रासमधील इतर विद्यालये बंद करण्यात आली आहेत.

याचबरोबर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) पॅरिसमधील कार्यालयामध्ये आज एका "लेटर बॉंब'चा स्फोट घडविण्यात आला. या हल्ल्यात एक नागरिक किरकोळ जखमी झाला. फ्रान्समधील अध्यक्षीय निवडणूक आता केवळ सहा आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील सुरक्षा दले या घटनांमागील प्रत्येक शक्‍यतेची कसून तपासणी करत आहेत.

Web Title: France on alert after school shooting, letter-bomb attack