पुतीन यांना झटका! नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याची फ्रान्स आणि स्वीडनची पुष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 14 September 2020

रशियाचे विरोधीपक्ष नेते अलेक्सी नवाल्नी यांच्यावर नोव्हीचॉक या विषाचा प्रयोग झाल्याचे फ्रान्स आणि स्वीडनमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

बर्लिन- रशियाचे विरोधीपक्ष नेते अलेक्सी नवाल्नी यांच्यावर नोव्हीचॉक या विषाचा प्रयोग झाल्याचे फ्रान्स आणि स्वीडनमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. नोव्हीचॉकचा वापर सोविएत महासंघाच्या काळात केला जात असे.

अलेक्सी नवाल्नी हे रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक आहेत. २० ऑगस्टला एका विमान प्रवासानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी उपचारांसाठी जर्मनीमध्ये धाव घेतली होती. त्यांच्यावर नोव्हीचॉक या विषाचा प्रयोग झाल्याचे जर्मनीमधील तज्ज्ञांनी सांगितले होते. त्याला आज फ्रान्स आणि स्वीडनमधील तज्ज्ञांनीही पुष्टी दिली आहे. 

प्रशांत भूषण यांनी १ रुपयाचा दंड भरला, पण फेरविचार याचिका दाखल करणार

नवाल्नी यांना विमान प्रवासादरम्यानच दगाफटका झाला असल्याचा संशय असून रशियाने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी जर्मनीने केली आहे. हेग येथील रासायनिक शस्त्रविरोधी संघटनेनेही नवाल्नी यांच्या रक्ताचा नमुना मागवला असून ते देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि इतर अनेक जागतिक नेत्यांनी रशिया सरकारकडून स्पष्टीकरणाची केलेली मागणी रशिया सरकारने धुडकावून लावली आहे. नवाल्नी प्रकरणामध्ये सरकारचा कोणताही हात नसून पाश्‍चिमात्य देश रशियाची प्रतिमा खराब करण्याचा डाव रचत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. नवाल्नी हे सध्या कोमामध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अध्यक्षीय निवडणुकीत उतरल्यामुळे नवाल्नी चर्चेत आले होते. त्याआधी रशियातील सरकारविरोधी चळवळींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. ४४ वर्षांचे उमदे, लढवय्ये व्यक्तिमत्व असलेल्या नवाल्नींचा जन्म रशियातील ओडिंटस्व्होस्की जिल्ह्यातील बुटयान येथे झाला. पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया, फायनान्स विद्यापीठ आणि येल विद्यापीठातून शिक्षण घेतानाच पुतीन यांच्या विरोधातील अनेक चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. सरकारच्या विविध धोरणांना विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 खासदारांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी एका संस्थेची स्थापना करून त्यांनी तिच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला. सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले व तुरुंगवासही भोगावा लागला. तरीही ते डगमगले नाहीत. २०१६ च्या निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात लढण्यासाठी त्यांनी तयारी केली. पण त्यांना निवडणुकीमधून बाद ठरवण्यात आले. तेव्हापासून नवाल्नी सातत्याने सत्ताधारी युनाटेड रशिया पक्षाच्या विरोधात आवाज उठवत आहेत.

आपले विचार नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी ते ‘नवाल्नी डॉट कॉम’ ही वेबसाईट, तसेच ‘यूट्यूब’ चॅनेलचा उपयोग करतात. त्याचे ३९.९ लाख सभासद आहेत. ‘याले वर्ल्ड फेलो’ हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांच्यावर सध्या जर्मनीत उपचार सुरू आहेत. ‘पुतीन ज्यांना सर्वात जास्त घाबरतात...’ असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वर्णन केलेले नवाल्नी सध्या मृत्यूशी झुंजत असलेल्या या लढवय्या शिलेदाराकडे जगाचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France and Sweden confirm that Navalny was poisoned