रशियाच्या सैनिकांच्या वेढ्यातून दोन महिन्यांनंतर सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Free from siege of Russian troops after two months citizens of Mariupol moved other places
रशियाचा वेढा उठला; दोन महिन्यांनंतर नागरिकांची सुटका

रशियाच्या सैनिकांच्या वेढ्यातून दोन महिन्यांनंतर सुटका

झापोरिझ्झिया : रशियाच्या सैनिकांच्या वेढ्यात अडकून पडलेल्या मारिउपोलमधील पोलाद प्रकल्पातील नागरिकांना बाहेर काढण्यास आजपासून सुरुवात झाली. शहरात इतर ठिकाणीही रशियन सैनिकांपासून लपून बसलेले नागरिक बाहेर पडत आहेत. या सर्वांना बसमधून शहराबाहेर नेण्यात येत आहे. युक्रेन युद्धाचा आज ६८ वा दिवस होता. रशियाच्या आक्रमणानंतर सुमारे दोन महिन्यांपासून मारिउपोल शहराला वेढा होता. त्यातही सर्व मारिउपोल शहर रशियाच्या ताब्यात आल्यानंतरही येथील पोलाद प्रकल्पात युक्रेनचे अनेक सैनिक आणि नागरिक अडकून पडले होते.

हे सैनिक पोलाद प्रकल्पातील भुयारांमध्ये लपून बसत रशियाच्या सैनिकांशी लढा देत होते. या सर्वांना बाहेर पडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, रणनितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मारिउपोलबाहेर जाण्याचे सर्व मार्ग रशियाने बंद केले होते. अखेर संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी केल्यानंतर नागरिकांना बाहेर पडण्यास रशियाने परवानगी दिली आहे. आज पोलाद प्रकल्पातील शंभरहून अधिक नागरिक बसमध्ये बसून झापोरिझ्झिया शहराकडे रवाना झाले. रेड क्रॉस संघटनेच्या मदतीने त्यांचे स्थलांतर सुरु आहे. मारिउपोलमध्ये एक लाख नागरिक अडकून पडले असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज रशियाच्या सैनिकांनाच युद्ध न करण्याचे आवाहन केले. रशियन भाषेतून केलेल्या आवाहनात झेलेन्स्की यांनी, युद्धामुळे तुमचाही जीव धोक्यात येत आहे, याची जाणीव करून दिली. मारिउपोलमधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी गटागटांतून जावे, असे आवाहन झेलेन्स्की यांनी केले आहे. बसची व्यवस्था केली असली तरी काही नागरिक स्वतंत्रपणे बाहेर पडत आहेत.

ओडेसा शहरातील विमानतळावर हल्ला

युक्रेनमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या ओडेसामधील विमानतळावर आज रशियाने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात विमानतळावरील एक धावपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इतरही धावपट्ट्यांचे नुकसान झाल्याने या विमानतळाचा सध्या वापर करता येणार नसल्याचे युक्रेनने सांगितले. रशियाच्या ताब्यातील क्रिमिया येथून रॉकेटद्वारे हा हल्ला करण्यात आला.

युद्धाच्या आघाडीवर

  • अमेरिकी काँग्रेसच्या अध्यक्षा नान्सी पेलोसी यांची युक्रेनला भेट

  • उन्हाळ्यानंतर रशियाकडून तेलखरेदी नाही : जर्मनी

  • पूर्व आघाडीवर रशियाची मोठी हानी : युक्रेन

  • ‘नाटो’ सैन्याचा युद्धसराव सुरु

  • रशियाच्या सायबर हल्लेखोरांकडून इतर देशांचे नेते लक्ष्य

  • रशियाच्या ताब्यात आलेल्या शहरांमध्ये रुबल चलनाचा वापर सुरु

Web Title: Free From Siege Of Russian Troops After Two Months Citizens Of Mariupol Moved Other Places

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top