ली पेन आणि मॅक्रॉन यांच्यात चुरस 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद (सोशालिस्ट पार्टी) यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. लोकप्रियता घटली असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असून, फ्रान्सच्या विद्यमान अध्यक्षाने दुसऱ्या टर्मसाठी प्रयत्न न करण्याची ही पहिलीच घटना आहे.

पॅरिस - फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदानाची पहिली फेरी आज पार पडली. अत्यंत चुरशीच्या ठरू शकणाऱ्या या निवडणुकीसाठी मतदानाला नागरिकांनी उत्साह दाखवला. 

फ्रान्सचे विद्यमान अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद (सोशालिस्ट पार्टी) यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. लोकप्रियता घटली असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असून, फ्रान्सच्या विद्यमान अध्यक्षाने दुसऱ्या टर्मसाठी प्रयत्न न करण्याची ही पहिलीच घटना आहे. या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट या पक्षाच्या मरीन ली पेन आणि एन मार्श या पक्षाचे नेते एमॅन्युएल मॅक्रॉन या दोघांमध्ये खरी चुरस असल्याचे चित्र आहे. आजच्या मतदानानंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास 7 मे रोजी आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमधून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाद्वारे अध्यक्षाची निवड होणार आहे. 

युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडत असल्याने फ्रान्सचे महत्त्व वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक होत आहे. युरोपीय महासंघ, वाढता दहशतवाद, निर्वासितांचा प्रश्‍न असे मुद्दे प्रचारादरम्यान चर्चिले गेले. ली पेन यांनी "इसिस'च्या धोक्‍याचा वारंवार उल्लेख करत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच, ब्रिटनप्रमाणेच फ्रान्सनेही युरोपीय महासंघाबाहेर पडावे, या मताच्या त्या आहेत. मॅक्रॉन (वय 39) हे निवडून आल्यास ते फ्रान्सचे सर्वाधिक तरुण अध्यक्ष ठरतील. फ्रान्सने युरोपीय महासंघातच राहावे आणि आपले महत्त्व वाढवावे, असे त्यांचे ठाम मत आहे. या दोघांबरोबरच माजी पंतप्रधान फ्रान्स्वा फिलन (द रिपब्लिकन्स) हेदेखील चांगली टक्कर देऊ शकतात.

Web Title: French election : Marine Le Pen and Emmanuel Macron leading the race as polls open