मॅक्रॉन यांनी स्वीकारली फ्रान्सची सूत्रे

वृत्तसंस्था
सोमवार, 15 मे 2017

आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या जनतेने आशेची निवड केली असून, त्यांना बदल हवा होता, हे दाखवून दिले, असे म्हटले. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अडचणीत आलेल्या युरोपीय महासंघाला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे मॅक्रॉन या वेळी म्हणाले

पॅरिस - "माझ्या देशवासीयांनी या निवडणुकीत आशेचा किरण निवडून बदल घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांना निराश करणार नाही,' असे म्हणत इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्सचे 25 वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. मॅक्रॉन हे फ्रान्सचे सर्वांत तरुण अध्यक्ष ठरले आहेत.

7 मे रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत "एन मार्श' पक्षाच्या मॅक्रॉन यांनी नॅशनल फ्रंट पक्षाच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला होता. त्यानंतर आज त्यांनी मावळते अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ओलॉंद यांनी आज मॅक्रॉन यांचे एल्सी पॅलेस या अध्यक्षीय प्रासादात स्वागत केले. यानंतर दोघांमध्ये बंद दारामागे बैठक होऊन ओलॉंद यांनी मॅक्रॉन यांच्याकडे देशाच्या अण्वस्त्रे प्रक्षेपित करण्याबाबतचे सांकेतिक क्रमांक सोपविले. या बैठकीनंतर मॅक्रॉन यांची राजकीय कारकीर्द सुरू करून देणाऱ्या ओलॉंद यांना त्यांच्याच या शिष्याने निरोप दिला.

इन्व्हेस्टमेंट बॅंकर असलेले मॅक्रॉन हे ओलॉंद यांच्याच मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या जनतेने आशेची निवड केली असून, त्यांना बदल हवा होता, हे दाखवून दिले, असे म्हटले. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने अडचणीत आलेल्या युरोपीय महासंघाला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू, असे मॅक्रॉन या वेळी म्हणाले. जग आणि युरोपला फ्रान्सची पहिल्यापेक्षा अधिक गरज असून, यासाठी आपण शक्तीशाली असणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. आपल्या या उद्दिष्टाला अधोरेखित करण्यासाठी ते उद्याच (ता. 15) जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांची बर्लिनमध्ये भेट घेणार आहेत.

Web Title: French president vows new start