
जी-७ परिषद : PM मोदींनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट, हिरोशिमामध्ये केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी-७ परिषदेसाठी जपान दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी मोदींना या परिषदेसाठी आमंत्रित केले होते. शनिवारी (२० मे) त्यांनी किशिदा यांची भेट घेतली. तसेच, हिरोशिमामध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. या माध्यमातून त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला.
गांधींच्या पुतळ्याचे अनावरण
पंतप्रधान मोदी (PM Modi) यावेळी म्हणाले, की हिरोशिमाचे नाव ऐकताच आजही जगभरातील लोकांचा थरकाप उडतो. अशा ठिकाणी जी-७ परिषदेच्या (G7 Summit) निमित्ताने मला महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. सध्या जग क्लायमेट चेंज आणि दहशतवादाशी झगडत आहे. अशा वेळी हा पुतळा (PM Modi unveils Mahatma Gandhi's bust in Hiroshima) जगाला अहिंसेचा संदेश देईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
"हा पुतळा हिरोशिमामध्ये स्थापन केला, आणि मला त्याचे अनावरण करण्याच संधी दिली याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानतो. आपण सर्वांनी महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर चालून, जगाच्या कल्याणासाठी कार्यरत राहणे हीच गांधींना खरी श्रद्धांजली असेल." असंही मोदी यावेळी म्हणाले.
बोधिवृक्षातून मिळणार संदेश
जपानचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान मोदींनी त्यांना बोधिवृक्ष भेट दिला होता. या बोधिवृक्षाला हिरोशिमामध्ये लावण्यात आले आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. या वृक्षाकडे पाहून लोकांना शांततेचा संदेश मिळेल."
किशिदा यांची भेट
दरम्यान, यावेळी मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा (Fumio Kishida) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी भारत-जपान संबंध, भारतातील जी-२० परिषद आणि जपानमधील जी-७ परिषद याबद्दल चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
जपानमधील हिरोशिमा शहरात सध्या जी-७ परिषद सुरू आहे. या परिषदेला जी-७ देशांव्यतिरिक्त अन्य काही देशांचे प्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी या परिषदेला संबोधित करणार आहेत.