सीरिया : चिमुकल्यांच्या जगण्याच्या धडपडीने जग हेलावले

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

तीन मुलींपैकी एका मुलीला मृत्यूने गाठले असून, दोघींची मृत्यूशी झुंज सुरू आहे, अशी माहिती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. इस्माईल यांनी दिली.

बिनिश (सीरिया) : बाँबमुळे उद्‌ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व धुळीने माखलेल्या दोन बहिणी लटकलेल्या अवस्थेतील तिसऱ्या बहिणीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीरियातील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले अन्‌ ते पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले नसल्यास नवलच. 

चिमुकल्या बहिणीचा बचाव करण्याची धडपड करणाऱ्या दोन बहिणी आणि त्यामागे त्यांना आधार देण्यासाठी हात पुढे केलेला आणि चेहऱ्यावर भीतीचे भाव असणारा त्यांचा सुहृद, असे छायाचित्र मन हेलावणारे व हृदय विदीर्ण करणारे ठरले. हे छायाचित्र बशर-अल शेख या छायाचित्रकाराने बुधवारी (ता. 24) टिपले. शेख हे 'एसवाय 24' या ऑनलाइन वृत्तवाहिनीसाठी काम करतात. सीरियातील वायव्येकडील इडलिब प्रांतातील अरिहा शहरावर लढाऊ विमानांनी हल्ला करून ते उद्‌ध्वस्त केले. या हल्ल्यात या मुलींचे घरही बेचिराख झाले. शहरातील भग्न इमारतींचे छायाचित्र काढताना शेख यांच्या नजरेसमोर घडलेला हा हृदयद्रावक प्रसंग त्यांनी कॅमेऱ्यातून टिपला. छायाचित्रात या बहिणीच्या मागे दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव तौफिक खतान असून तो मदतकार्यातील कर्मचारी आहे. 

कुटुंबावर मृत्यूचे सावट 
तीन मुलींपैकी एका मुलीला मृत्यूने गाठले असून, दोघींची मृत्यूशी झुंज सुरू आहे, अशी माहिती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. इस्माईल यांनी दिली. छायाचित्रात सात महिन्यांच्या तौका या चिमुकलीच्या हिरव्या रंगाच्या शर्टला पकडून ठेवत तिला वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिची बहीण रिहम अल अब्दुल्ला (वय 5) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तौकाच्या डोक्‍याला मार लागला असून, तिला दक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. छायाचित्रात दिसणारी तिसरी बहीण डालिया हिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

या तिघी बहिणींच्या अन्य तीन बहिणी व आईचाही या हल्ल्यांत मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl dies after saving sisters life in heart stopping airstrike photo in Syria