अस्मा जहाँगीर यांचे लाहोरमध्ये निधन 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मानवाधिकारांबाबत अत्यंत आग्रही असलेल्या अस्मा या स्पष्ट वक्‍त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. मानवाधिकारांसाठी काम करताना त्यांनी सर्व प्रकारचे दबाव आणि विरोध झुगारून दिले. पाकिस्तानात लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले.

लाहोर : पाकिस्तानातील ज्येष्ठ वकील व प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मा जहॉंगीर (वय 66) यांचे आज लाहोरमध्ये निधन झाले.

हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती ज्येष्ठ वकील अदिल राजा यांनी दिली. अस्मा यांच्या निधनामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अस्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मानवाधिकारांबाबत अत्यंत आग्रही असलेल्या अस्मा या स्पष्ट वक्‍त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. मानवाधिकारांसाठी काम करताना त्यांनी सर्व प्रकारचे दबाव आणि विरोध झुगारून दिले. पाकिस्तानात लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत काम केले. पाकिस्तानातील मानवाधिकार आयोगाच्या त्या सहसंस्थापक होत्या. या आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी तत्कालीन लष्करशहा झिया उल हक यांच्या विरोधातील आंदोलना वेळी अस्मा यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news Asma Jahangir Pakistan human rights champion dies