डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आगपाखड 

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अमेरिकेशी द्वीपक्षीय व्यापार करताना नियमांचा दुरुपयोग करणाऱ्या देशांवर त्यांच्याप्रमाणेच कर आकारणी करण्यात येईल. 
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका 

वॉशिंग्टन : हार्ले-डेव्हिडसन कंपनीच्या दुचाकींवर जादा आयात शुल्क आकारणी करण्याच्या भारताच्या निर्णयावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जोरदार टीका केली. अमेरिकेत येणाऱ्या लाखो भारतीय मोटारींवरील आयात शुल्कात वाढ करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. 

अमेरिकी संसदेच्या व्यापार समितीसमोर बोलताना ट्रम्प म्हणाले, ""नुकताच भारताने दुचाकींवरील आयात शुल्क 75 टक्‍क्‍यांवरून 50 टक्‍क्‍यांवर आणण्याचा निर्णय घेतला. याचवेळी अमेरिका मात्र, दुचाकींवर आयात शुल्क आकारत नाही. आपली उत्पादने दुसऱ्या देशांमध्ये विकण्यासाठी आपण प्रचंड कर भरतो. हार्ले-डेव्हिडसनही अशाच एका देशात विक्रीसाठी जाते. हे भारतात घडते हे मी उघड करणार नाही.'' त्यांनी असे नमूद केल्यानंतर सदस्यांमध्ये हास्यकल्लोळ उडाला. 

याचबरोबर ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकत्याच झालेल्या संभाषणाचा संदर्भही या वेळी दिला. ते म्हणाले, ""भारतातून एका मोठ्या सभ्य गृहस्थाने माझ्याशी दूरध्वनीवरून नुकताच संवाद साधला. त्यांनी दुचाकींवरील आयात शुल्क 100 तसेच, 75 टक्‍क्‍यांवरून 50 टक्‍क्‍यांवर आणल्याचे मला सांगितले. आमच्या हार्ले-डेव्हिडसनवर 50 ते 75 टक्के आयात शुल्क आकारण्यात येत आहे. याचवेळी अमेरिकेत तुम्ही लाखो दुचाकींची विक्री करता. या दुचाकी भारतातून आल्या आहेत, हेही नागरिकांना माहिती नसते. या दुचाकींवर आम्ही किती शुल्क आकारतो? शून्य.'' 

अमेरिकेशी द्वीपक्षीय व्यापार करताना नियमांचा फायदा घेणाऱ्या देशांना त्यांच्या कृतीप्रमाणेच उत्तर देण्यात येईल. ते ज्याप्रमाणे कर आकारतात त्याप्रमाणेच अमेरिकाही कर आकारणी करेल. यालाच योग्य व्यापार म्हणतात. तसेच, मुक्त व्यापारही म्हणतात. तुम्ही जो कर आकारता तो आम्हीही आकारणार. तुम्ही कर आकारणे बंद केल्यास आम्ही बंद करू आणि तो मग मुक्त व्यापार ठरेल,'' असे त्यांनी नमूद केले. 

अमेरिकेशी द्वीपक्षीय व्यापार करताना नियमांचा दुरुपयोग करणाऱ्या देशांवर त्यांच्याप्रमाणेच कर आकारणी करण्यात येईल. 
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष अमेरिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global news Dont Know Why India Was Allowed To Get Away Donald Trump On Harley Bike Taxes