मालदीवमध्ये आणीबाणी लागू 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

अध्यक्ष यमीन यांनी न्यायाधीशांना आपला आदेश मागे घेण्याची विनंती करणारी तीन पत्रे पाठविली होती. त्यानंतर आज आणीबाणी जाहीर केली. यमीन यांनी देशात दुसऱ्यांदा आणीबाणी लादली आहे. यापूर्वी आपल्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत त्यांनी नाव्हेंबर 2015 मध्ये आणीबाणी लादली होती. 

माले : मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांनी सोमवारी देशात पंधरा दिवसांची आणीबाणी जाहीर केली. अध्यक्षांचे सहकारी अझिमा शुकूर यांनी सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणीवाहिनीवरून आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली. 

यामुळे मालदीवमधील राजकीय पेचप्रसंग आणखी गंभीर झाला आहे. आणीबाणीमुळे लष्कराला अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत. आता कोणत्याही संशयित व्यक्तीला लष्कर तत्काळ अटक करू शकते. आजच्या आणीबाणीमुळे सरकार व सर्वोच्च न्यायालयातील संघर्ष कायम राहिला आहे. राजकीय कैद्यांना सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यास अध्यक्ष यमीन यांनी नकार दिल्याने मालदीवमध्ये सध्या राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्याचे पर्यवसान आज आणीबाणीत झाले. न्यायालयाचा आदेश पाळण्याबाबत जागतिक स्तरावरून दबाव येऊनही यमीन आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. 

अध्यक्ष यमीन यांनी न्यायाधीशांना आपला आदेश मागे घेण्याची विनंती करणारी तीन पत्रे पाठविली होती. त्यानंतर आज आणीबाणी जाहीर केली. यमीन यांनी देशात दुसऱ्यांदा आणीबाणी लादली आहे. यापूर्वी आपल्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत त्यांनी नाव्हेंबर 2015 मध्ये आणीबाणी लादली होती. 

अध्यक्षांनी दोन दिवसांत संसदेला आणीबाणीची माहिती देणे बंधनकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सध्या संसद विसर्जितच करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी यमीन यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्या बारा खासदारांचे पद कायम ठेवल्याने 85 सदस्यांच्या संसदेत विरोधकांना बहुमत प्राप्त झाले होते. त्यामुळे यमीन यांनी आणीबाणीचे पाउल उचलल्याचे मानले जाते.
 
Web Title: global news Maldives president declares emergency arrests judges