
Global water survey : अवकाशातून होणार जागतिक जलसर्वेक्षण
वॉशिंग्टन : पृथ्वीवरील ७० टक्के भूभाग हा पाण्याने व्यापला असला तरी नक्की किती पाणी आहे, याची निश्चित माहिती घेण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ जगातील सागर, सरोवरे, नद्या यांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम राबविण्यात येणार असून ‘सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी (स्वोट) उपग्रहाचे उड्डाण गुरुवारी (ता.१५) सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान (भारतीय प्रमाणवेळेनुसार) दक्षिण कॅलिफोर्नियातून होणार आहे. पृथ्वी विज्ञान प्रकल्पाअंतर्गत ही मोहीम ‘एसएए’, ‘स्पेसएक्स’ आणि फ्रान्सची अवकाश संशोधन संस्था ‘सेंटर नॅशनल डिइट्यूड्स स्पॅटिअल्स’ (सीएनईएस) यांच्या सहकार्याने प्रत्यक्षात येणार आहे. ‘स्वोट’तर्फे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या जागतिक सर्वेक्षणाचा हा पहिलाच प्रयोग आहे. हा प्रगत रडार उपग्रह असून भूतलावरील जलसाठ्यांचे दर्शन शास्त्रज्ञांना होणार आहे. यामुळे हवामान बदलाचा परिणाम आणि प्रक्रिया यावर प्रकाश टाकला जाणार आहे.
जगातील धनाढ्य एलॉन मस्क यांच्या मालकीची ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या ‘फाल्कन एक्स’ हा प्रक्षेपक ‘स्वोट’सह उड्डाणासाठी तयार आहे. लॉसएंजिल्सपासून २७५ किलोमीटर अंतरावरील व्हॅन्डेबर्ग येथील अमेरिकेच्या अवकाश तळावरून हा ‘एसयूव्ही’ आकाराचा उपग्रह उद्या सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान अवकाशात सोडला जाईल. सुमारे २० वर्षांच्या संशोधनानंतर ‘स्वोट’ विकसित झाला आहे. यामध्ये प्रगत सूक्ष्मलहरी रडार तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
या प्रयोगातून...
सर्वकाही नियोजनानुसार झाले तर काही महिन्यांतच उपग्रहाकडून संशोधनपर माहिती मिळण्यास सुरुवात
दर २१ दिवसांतून किमान दोनदा रडारमधील संकलित माहिती मिळेल
महासागर अभिसरण प्रणाली, हवामानाच्या अंदाजासाठी माहिती उपयुक्त ठरणार
दुष्काळग्रस्त भागात दुर्मिळ गोड्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मदत होणार