सुंदर पिचईंची 12 अब्ज रुपयांहून अधिक कमाई

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

पिचई यांना गेल्यावर्षी सुमारे 650,000 डॉलरचे वेतन मिळाले. अगोदरच्या वर्षात मिळालेल्या 652,500 डॉलरपेक्षा हा आकडा किंचित कमी आहे. परंतु त्यांच्या शेअर हक्कात वाढ झाल्याने एकुण मोबदल्यात वाढ झाली

मुंबई: गुगल या प्रसिद्ध सर्च इंजिनचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांना गेल्यावर्षी (2016) तब्बल 20 कोटी डॉलर अर्थात 12.85 अब्ज रुपयांचा मोबदला मिळाला आहे. पिचई यांनी कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर दोन वर्षांच्या कारकिर्दीत गुगलने अनेक यशस्वी उत्पादने सादर केली. त्याचाच मोबदला म्हणून त्यांना वेतनापोटी भव्य रक्कम मिळाली आहे.

पिचई यांना गेल्यावर्षी सुमारे 650,000 डॉलरचे वेतन मिळाले. अगोदरच्या वर्षात मिळालेल्या 652,500 डॉलरपेक्षा हा आकडा किंचित कमी आहे. परंतु त्यांच्या शेअर हक्कात वाढ झाल्याने एकुण मोबदल्यात वाढ झाली. पिचई यांना गेल्यावर्षी 19.87 कोटी डॉलरचे शेअर्स मिळाले. अगोदरच्या वर्षात हा आकडा केवळ 9.98 कोटी डॉलरएवढा होता.

पिचई यांच्या नेतृत्वाखाली गुगलच्या कोअर जाहीराती आणि युट्यूब व्यवसायातून होणाऱ्या विक्रीत वाढ झाली. याशिवाय, कंपनीला मशीन लर्निंग आणि हार्डवेअर आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये गुंतवणूकीचादेखील मोठा फायदा झाला आहे. याशिवाय, कंपनीने गेल्यावर्षी नवे स्मार्टफोन, व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट आणि व्हॉईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकरसारखी उत्पादने सादर केली. सरलेल्या तिमाहीत गुगलला इतर उत्पन्नापोटी 3.1 अब्ज डॉलरची रक्कम मिळाली आहे. या उत्पन्नात 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Web Title: Google CEO Sundar Pichai received nearly US $200 million salary last year