धुमसती लंका : पंतप्रधानांकडून अप्रत्यक्ष समर्थन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gota Go Gama movement should continue pm Ranil Wickremesinghe sri lanka
धुमसती लंका : पंतप्रधानांकडून अप्रत्यक्ष समर्थन

धुमसती लंका : पंतप्रधानांकडून अप्रत्यक्ष समर्थन

कोलंबो : श्रीलंकेत राजकीय उलथापालथ सुरू असताना काल सायंकाळी रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘गोटा गो गामा’ आंदोलन सुरू राहवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या आंदोलनात पोलिसांचा हस्तक्षेप राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नव्या मंत्रिमंडळाबाबत अद्याप विचार झाला नसल्याचे विक्रमसिंघे यांनी सांगितले.

श्रीलंकेत अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांच्या विरोधात ‘गोटा गो गामा’ या घोषणेचा वापर केला जात आहे. सिंहली भाषेत गामाचा अर्थ हा गाव आहे. गोटाबया यांनी गावाकडे जावे असे आंदोलनकर्ते म्हणत आहेत. आंदोलककर्ते एका ठिकाणी एकत्र येऊन गाड्यांचा हॉर्न वाजवतात आणि अध्यक्ष व सरकारविरोधात ‘गोटा गो गामा’ असे घोषणाबाजी करत असतात. दरम्यान, ७३ वर्षीय रानिल विक्रमसिंघे हे कुशल राजकारणी म्हणून आणि अमेरिका समर्थक मानले जातात. भारत आणि अमेरिकेने रानिल विक्रमसिंघे यांचे अभिनंदन केले आहे.

अमेरिकेच्या श्रीलंकेतील राजदूत ज्युली चुंग यांनी ट्विटरवर पंतप्रधान विक्रमसिंघे यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की अमेरिका नव्या पंतप्रधानासमवेत काम करण्यास अमेरिका उत्सुक आहे. त्यांची नियुक्ती आणि सरकारची लवकरात लवकर स्थापना करणे हे देशातील आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी आणि स्थिरतेसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. श्रीलंकेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांत अमेरिका सहभागी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जमावाने केली खासदाराची हत्या

तीन दिवसापूर्वी श्रीलंकेत उसळलेल्या हिंसाचारात खासदार अमरकिर्ती अथुकोरला यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला. परंतु आता पोलिसांनी अमरकिर्ती यांची हत्या झाल्याचे म्हटले आहे. जमावाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

ठळक नोंदी

  • श्रीलंकेत हिंसा माजविणाऱ्या ५९ सोशल मीडिया ग्रुपची ओळख पटली

  • हिंसा माजविणाऱ्या व्यक्तींवर गोळीबार करण्याचे निर्देश

  • पाच तास वीज कपातीस मंजुरी

भारतीय उच्चायुक्त विक्रमसिघेंना भेटले

कोलंबो: श्रीलंकेत भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी शुक्रवारी श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या सद्यःस्थितीवर चर्चा केली. विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर त्यांची भेट घेणारे बागले हे पहिले परकी अधिकारी आहेत. श्रीलंका सध्या कर्जबाजारी असून त्यापासून बाहेर पडण्यासाठी आणि राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी युनायटेड नॅशनल पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे (वय ७३) यांनी काल श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

शेअर बाजारात तेजी

आर्थिक अस्थिरतेमुळे श्रीलंकेतील शेअर बाजार डळमळीत झालेला असताना काल शेअर बाजारात दिलासादायक वातावरण दिसून आले. दोन दिवसांपासून बंद असलेला बाजार गुरुवारी सुरू झाला असता त्यात तीन टक्के तेजी दिसून आली. नव्या पंतप्रधानांच्या नियुक्तीमुळे राजकीय स्थिरतेचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बाजारावर सकारात्मक परिणाम दिसला.

Web Title: Gota Go Gama Movement Should Continue Pm Ranil Wickremesinghe Sri Lanka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top