ऑस्ट्रेलियाच्या आगीची धग गौतम अदानींना; ट्विटरवर #stopadaniहॅशटॅग

टीम ई-सकाळ
Monday, 13 January 2020

अदानी उद्योग समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्याची मागणी करण्यात आलीय.

बर्लिन (जर्मनी) : ऑस्ट्रेलियात गेल्या आठवड्यात पेटलेल्या वणव्यानं संपूर्ण जगाच्या डोळ्यांत पाणी आलं. लाखो प्राण्यांना सूक्ष्म जीवांना, कीटकांना या आगीत आपला जीव गमवावा लागलाय. या आगीवरून आता भारतातील उद्योगपती गौतम अदानी चर्चेत आलेत. आगीनंतर अदानी उद्योग समूहाच्या ऑस्ट्रेलियातील खाण प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्याची मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे, ही मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं केल्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलयं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे ग्रेटानं आवाहन?
ऑस्ट्रेलियात अदानी उद्योग समूहाचा कारमायकेल कोळसा खाण हा प्रकल्प आहे. अदानी उद्योग समूहाला या कोळसा खाणीत ज्या रेल्वेचा वापर करावा लागतो त्यासाठी सिग्नल टेक्नॉनॉजी देण्याचं काम जर्मनीच्या सिमेन्स कंपनीला देण्यात आलंय. अदानी समूहाच्या वादग्रस्त कोळसा खाण प्रकल्पाविषयी सिमेन्सनं आढावा घ्यावा, असं आवाहन ग्रेटानं केलंय. हे आवाहन करताना तिनं ट्विटरवर #stopadaniअसा हॅशटॅगही सुरू केलाय. ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरण बचाव मोहिमेचा जगाचा चेहरा बनली आहे. तिनं पर्यावणासाठी निसर्गात हस्तक्षेप करणाऱ्यांच्या विरोधात युवा चळवळ सुरू केलीय. ग्रेटानं ट्विट करताना, सिमेन्सपुढं आव्हान उभं केलयं. सिमेन्स कंपनीनं ठरवलं तर, ते अदानी उद्योग समूहाच्या वादग्रस्त कोळसा खाणीचं काम थांबवू शकतात किमान पुढं ढकलू शकतात, असं ग्रेटानं म्हटलंय. तसचं नागरिकांनी कंपनीला योग्य निर्णय घेण्यासाठी भाग पाडावं, असं आवाहन ग्रेटानं केलंय.

आणखी वाचा - शिवभक्तांच्या संतापापुढे भाजप झुकले!

अदानींच्या प्रकल्पाला विरोध का?
ऑस्ट्रेलियातील अदानी उद्योग समूहाची खाण ही पृथ्वीवरची सर्वांत मोठी कोळसा खाण आहे. त्याविरोधात जगभरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना आवाज उठवला आहे. आता आगीच्या घटनेनंतर या कोळसाखाणी विरोधातील आंदोलनाला आणखी धार आली आहे.  अदानी समूहाने ऑस्ट्रेलियातील गॅलील बसिन या कंपनीकडून 2010मध्ये सेंट्रल क्विन्सलँड परिसरात आणि उत्तरेतील बोवेन जवळ खाण विकत घेतली होती. क्विन्सलँड परिसरातील अनेक खाणी ह्या वादाचा विषय आहे. कारण, त्या परिसरातील जैवविविधता या खाणींमुळं धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. तसेच कोळसा पेटवण्यासाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: greta thunberg tweet stop adani australia fire coal mine