नोटाबंदीमुळे विकासदरात घट

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

चीनचा विकासदर वाढला
भारताचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या चीनच्या विकासदरामध्ये मात्र 0.1 टक्‍क्‍याने वाढ झाली असून, मागील वर्षी 6.6 टक्‍के असणारा विकासदर 6.7 टक्के झाला असल्याचे आयएमएफच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गतिमान विकसित अर्थव्यवस्थांचा चीन प्रमुख वाहक असल्याचेही सांगत या अहवालात चीनवर स्तुतिसुमने उधळण्यात आली आहेत.

वॉशिंग्टन : ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भारताचा विकासदर सरासरीपेक्षा खालावला असून, एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) दर 7.6 टक्‍क्‍यांवरून 6.6 टक्‍क्‍यांवर येऊन 1 टक्‍क्‍यांची कपात झाल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आज सांगितले. मात्र, आगामी आर्थिक वर्षामध्ये जीडीपी पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे, असेही "आयएमएफ'चे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा हा "तात्पुरता नकारात्मक वापरासंदर्भातील धक्का' असल्याचेही आयएमएफने म्हटले आहे.

आयएमएफने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकच्या (डब्ल्यूईओ) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जागतिक बाजारात उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था, बाजारातील स्थिती यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. तसेच जागतिक वाढीचे उद्दिष्ट 3.4 टक्‍क्‍यांवरून 3.6 टक्के झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

या अहवालात भारताच्या विकासदरावर प्रकाश टाकताना मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा विकासदर एक टक्‍क्‍याने घटला असल्याचे सांगण्यात आले आहे. 2015-16 या आर्थिक वर्षाचा विकासदर 7.6 टक्के होता, तो 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 6.6 टक्के झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. विकासदर घटण्यामागे नोटाबंदीचा निर्णय असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सुधारणावादी निर्णय घेतल्यामुळे विकासदर पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: growth rate declined due to note ban