पाकिस्तानमध्ये हिंदू आणि मंदिरांचं अस्तित्व धोक्यात; दिवसेंदिवस होतेय घट

टीम ई-सकाळ
Wednesday, 27 January 2021

हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला तर पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक राष्ट्र म्हणून उदयास आला.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात कट्टरपंथी इस्लामिक पक्षाच्या सदस्यांनी हिंदू मंदिराची तोडफोड केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यामुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने जगासमोर आला आहे. खैबर पख्तूनख्वामधील कराक जिल्ह्यातील टेरी गावातील हिंदू मंदिराची जमावाने तोडफोड केली.

१९४७ला फाळणीनंतर पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र म्हणून उदयास आले. तेथील हिंदू अल्पसंख्यांक म्हणून गणले जातात. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरे होती. त्यापैकी बहुतेक मंदिरांची सध्या अवस्था दयनीय आहे. त्यामुळे ज्यांची स्थिती चांगली आहे, अशाच मंदिरांत पूजा-अर्चा केली जाते. काही दिवसांपूर्वी इस्लामाबादमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधण्याची तयारी सुरू होती. पण एका पाकिस्तानी संस्थेने त्याच्या बांधकामालाच विरोध केला. इस्कॉनने उभारलेली दोन मंदिरे सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. 

May be an image of monument

मजुराची तीन वर्षांची कमाई मुकेश अंबानी कमावतात अवघ्या सेकंदात

पाकिस्तान कट्टर इस्लामी राष्ट्र म्हणून उदयास आला
हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या आधारावर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला तर पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक राष्ट्र म्हणून उदयास आला. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये धार्मिक द्वेष शिगेला पोहोचला होता. त्यामुळे तेथील हिंदू अल्पसंख्यांकांना मंदिर बांधण्याचा विचारही करता आला नाही. इतकेच नव्हे तर ६ डिसेंबर १९९२ मध्ये जेव्हा अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरण घडले, तेव्हा पाकिस्तानमधील सुमारे १०० मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. 

फाळणीवेळी पाकिस्तानमध्ये होती ४२८ मंदिरे
ऑल पाकिस्तान हिंदू राइट्स मूव्हमेंटने एक सर्वेक्षण केलं आहे. जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा मोठ्या संख्येत हिंदू आणि शीख पाकिस्तानमधून हिंदुस्तानमध्ये आले होते. त्यावेळी पाकिस्तानमध्ये ४२८ मंदिरे होती. १९९०च्या सुमारास मंदिरावर कब्जा करून त्याठिकाणी दुकाने, रेस्टॉरंट, होटेल्स, कार्यालये, सरकारी शाळा किंवा मदरसे उघडण्यात आली. पाक सरकारने अल्पसंख्यांकाची प्रार्थनास्थळांची १.३५ लाख एकर जमीन इव्हॅक्युए प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डकडे भाड्याने दिली. याच ट्रस्टने सर्व मंदिरांची जमीन हडप केल्याचा आरोप सर्वेमध्ये करण्यात आला आहे. 

May be an image of standing and temple

इस्कॉनतर्फे मंदिर उभारणी
२००० नंतर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिसनेस संस्था अर्थात इस्कॉनने पाक सरकारशी वाटाघाटी करत तिथं मंदिर उभारण्याचे प्रयत्न सुरू केले. न्यूयॉर्क आणि ब्रिटनशी असलेले संबंध याकामी महत्त्वाचे ठरले. गेल्या वर्षी इम्रान सरकारने मंदिरे पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला होता. 

सीमेवर भारतीय जवानांच्या दणक्यानंतर चीनची पहिली प्रतिक्रिया​

ज्या मंदिरांची अवस्था खूप वाईट होती, त्यांची डागडुजी करण्यासाठी पाक सरकारने सरकारी फंडातून निधी देण्याची घोषणा केली होती. २०१९ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट मधील १ हजार वर्षांहून जुनं असं प्राचीन शिवाला तेजा मंदिर पुन्हा उघडण्यात आलं. फाळणी झाल्यापासून हे मंदिर बंद होते आणि १९९२मध्ये या मंदिराचे खूप नुकसान करण्यात आले होते. या मंदिराच्या नूतनीकरणासाठी ५० लाखाहून अधिक खर्च आला होता. 

प्रसिद्ध काली बारी मंदिर दारा इस्माईल खान यांनी विकत घेतले आणि त्याचं रुपांतर ताजमहल हॉटेलमध्ये केलं आहे. तसेच खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू जिल्ह्यात एक हिंदू मंदिर होतं त्याठिकाणी आता मिठाईचं दुकान आहे. कोहाटमधील एका शिव मंदिराचं सरकारी शाळेत रुपांतर करण्यात आलं आहे. 

May be an image of monument

रावळपिंडीमधील एका हिंदू मंदिर पाडून त्याठिकाणी व्यावसायिक संकुल बनविण्यात आलं. अबोटाबादमधील गुरुद्वारा तोडून त्याठिकाणी कपड्यांचं दुकान सुरू करण्यात आलं. चकवालमधील १० मंदिरे तोडून तिथं कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारलं आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सरकारी सर्व्हेनुसार, २०१९मध्ये सिंधमध्ये ११, पंजाबमध्ये ४, बलुचिस्तानमध्ये ३ आणि खैबर पख्तुनख्वामध्ये २ मंदिरे चांगल्या स्थितीत आहेत. म्हणजे एकूण २० मंदिरे उरली आहेत. 

अरारारारा... पाकवर सर्वांत मोठे पार्क गहाण ठेवायची आली वेळ; जिन्नांची ओळख विकून लोन​

जबरदस्तीने धर्मांतर
आधीच अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची संख्या घटू लागली आहे. बिगर मुस्लीम मुलीचं अपहरण, धर्मांतर आणि त्यानंतर जबरदस्तीने मुस्लीमाशी लग्न करण्याच्या घटना आता नेहमीच्या झाल्या आहेत. युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम डेटाच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी १ हजारहून अधिक मुलींचं धर्मांतर केलं जातं. यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय मुलींचा प्रामुख्याने समावेश असतो. 

फाळणीवेळी होते १५ टक्के हिंदू
जेव्हा फाळणी झाली, तेव्हा पश्चिम पाकिस्तानमध्ये १५ टक्के हिंदू होते. १९९८च्या जनगणनेनुसार याठिकाणी आता फक्त १.६ टक्के हिंदू राहिले आहेत. १९४१ मध्ये पूर्ण पाकिस्तानमध्ये १४ टक्के भारतीय होते. पण फाळणीनंतर ही संख्या कमी होत आता १.३ टक्क्यांवर येऊन पोचली आहे. 

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hindu population and temples decreased continuously in Pakistan