'अमेरिकेमुळेच हाँगकाँग अस्थिरतेत'

पीटीआय
रविवार, 15 डिसेंबर 2019

- चीनच्या भारतातील राजदूतांचा घणाघाती आरोप 

नवी दिल्ली : हॉंगकॉंगला अस्थिर करण्यासाठी बाहेरील शक्तींचा हस्तक्षेप वाढला असून, येथील परिस्थिती आणखी बिघडावी म्हणून अमेरिकेकडून खतपाणी घातले जात असल्याचा आरोप आज चीनकडून करण्यात आला. हॉंगकॉंगमधील परिस्थिती चिघळावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही चीनने केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनचे भारतातील राजदूत सन वेईडोंग यांनी आज "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत हॉंगकॉंगमध्ये बाहेरील शक्तींचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला. वेईडोंग म्हणाले की, हॉंगकॉंगची प्रगती आणि स्थिरता कायम राहावी हे भारतासह इतर सर्वच देशांच्या हिताचे आहे.

'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

"एक देश, दोन यंत्रणा' असे चीनचे हॉंगकॉंगबाबतचे धोरण असून, ते पुढेही कायम राहील. मात्र, हॉंगकॉंगमध्ये गोंधळाची परिस्थिती तयार करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न बाहेरील शक्तींकडून होत आहे. हॉंगकॉंगमधील गोंधळाला अमेरिका जबाबदार आहे.

अमेरिकेच्या या कृतीच्या विरोधात चीनने आवश्‍यक ती पावले टाकली आहेत. हॉंगकॉंगच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे अमेरिकेने थांबवावे. असे न केल्यास अमेरिका स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल. 

गुंतवणूकदारांची हॉंगकॉंगकडे पाठ 

हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे हे शहर तांत्रिकदृष्ट्या आर्थिक मंदीच्या तोंडावर उभे आहे. हॉंगकॉंगमधील पर्यटन आणि सेवा क्षेत्राला हिंसाचाराचा मोठा फटका बसला आहे.

परिणामी विदेशी गुंतवणूकदारांनी हॉंगकॉंगकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे, असे वेईडोंग म्हणाले. व्यापारी युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि चीन दरम्यान जोरदार प्रयत्न सुरू असताना चीनकडून वरील आरोप करण्यात आले आहेत हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hong Kong unrest due to US