शंभर दिवसांत एकही स्थानिक कोरोना रुग्ण सापडला नाही; जगाच्या पाठीवरचा एकमेव देश

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 9 August 2020

जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोना विषाणूसमोर हतबल झाले आहेत. अशात न्यूझिलंडने या महामारीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसत आहे

वेलिंग्टन- जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोना विषाणूसमोर हतबल झाले आहेत. अशात न्यूझिलंडने या महामारीवर नियंत्रण मिळवल्याचं दिसत आहे. कारण गेल्या 100 दिवसात या देशामध्ये एकही स्थानिक कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. सध्या देशात 23 कोविड-19 चे रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण देशात प्रवेश करत असताना सीमेवर आढळले आहेत. त्यांना वेगळे करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

"भगवान रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरीतला; येथे भव्य राम मंदिर उभारु...

न्यूझिलंडचे आरोग्य महासंचालक अॅशले ब्लुमफिल्ड यांनी याबाबत माहिती दिली आहे. जवळजवळ 100 दिवस समुदाय प्रसार रोखणे हे खूप मोठे यश आहे. असे असले तरी आपण निष्काळजीपणा करु शकत नाही. तसेच आत्मसंतुष्टही होऊ शकत नाही, असं ते म्हणाले आहेत. आपण यापूर्वी पाहिलं आहे की कोरोना विषाणू किती वेगाने पसरतो आहे. शिवाय ज्या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आला आहे, त्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक पुन्हा होत आहे. त्यामुळे भविष्यासाठी आपल्याला तयार रहायला हवं, असंही अॅशले म्हणाले आहेत.  

न्यूझिलंडची लोकसंख्या जवळजवळ 50 लाख आहे. देशाने 19 मार्चला आपल्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यानंतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॅसिड्रा अॅडर्न यांनी ज्या पद्धतीने कोरोना विषाणू परिस्थिला हाताळले, त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने न्यूझिलंडचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. न्यूझिलंडने यशस्वीरित्या कोरोनाचा समुदाय प्रसार रोखला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 

धमकी देणाऱ्या पाकिस्तानला सऊदी अरेबियाने दिला झटका

न्यूझिलंडमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण फेब्रुवारी महिन्यात आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत देशात 1,219 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शेवटच्या समुदाय प्रसाराचे प्रकरण 1 मे रोजी आढळले होते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने येथील नागरिक कोरोनाच्या पूर्वी असलेले साधारण जीवन जगत आहेत. देशातील सर्व उद्योगधंदे, उद्याने, चित्रपटगृहे सुरु आहेत. तसेत नागरिकांवरील सामाजिक अंतराचे बंधनही काढून टाकण्यात आले आहे. असे असले तरी सीमा भागात कडक खबरदारी घेण्यात आली आहे. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस विलगीकरणात राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

न्यूझिलंड कोरोना महामारीच्या दुसऱ्या उद्रेकासाठीही तयारी करत आहे. यासाठी सर्व नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. शिवाय आणीबाणीसाठी सुरक्षा किट बाळगण्यास सांगितलं आहे.

(edited by-kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In a hundred days no local corona patient was found in this country