भारतपुत्र कुलभूषण यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मिळाला न्याय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून आज निकाल जाहीर करण्यात येणार होता. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. तसेच केँद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी कोठेही जाण्याची तयारी दर्शविली होती. तसेच देशभरात त्यांच्या फाशीला स्थगिती मिळण्यासाठी होमहवन करण्यात येत होते. भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने यश आले आहे.

हेग - भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीबाबत गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) निकाल दिला असून, भारताच्या या मुलाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्याय मिळाला. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणण्याचा निर्णय दिला आहे. 

भारत आणि पाकिस्तानची बाजू ऐकून घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून आज निकाल जाहीर करण्यात येणार होता. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. तसेच केँद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कुलभूषण जाधव यांच्यासाठी कोठेही जाण्याची तयारी दर्शविली होती. तसेच देशभरात त्यांच्या फाशीला स्थगिती मिळण्यासाठी होमहवन करण्यात येत होते. भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने यश आले आहे.

अकरा न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनाविला. न्यायाधीश रॉनी अब्राहम यांनी निकाल सुनाविताना सांगितले, की भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात व्हिएन्ना करारानुसार दाद मागितली होती. व्हिएन्ना करारात भारत आणि पाकिस्तान दोन्ही बांधले गेले आहेत. दोन्ही देशांनी मान्य केले आहे, की कुलभूषण जाधव भारतीय आहेत. जाधव यांना अटक करणे वादग्रस्त विषय आहे. भारताला त्यांच्या अटकेबाबत 25 मार्चला माहिती देण्यात आली होती. पाकिस्तानने जाधव यांना वकील नेमण्याची संधी द्यायला हवी होती. त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणण्यात येत आहे. जाधव हेर आहेत की नाहीत हे अद्याप  सिद्ध झालेले नाही.

जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. आपली लंगडी बाजू मांडताना दमछाक झालेल्या पाकिस्तानने सर्व आरोप फेटाळले असले, तरी भरकटलेली मांडणी केल्याने त्यांनी स्वत:ची नाचक्की ओढवून घेतली होती. 

जाधव यांना गेल्या वर्षी तीन मार्चला पाकिस्तानने अटक केली होती. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप ठेवत फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली. याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ठामपणे आपली बाजू मांडली. भारतातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी प्रामुख्याने बाजू मांडली होती. 

युक्तिवादादरम्यान भारताने मांडलेले मुद्दे 

 • जाधव यांना इराणमधून पाकिस्तानात पळवून आणून खटला चालविला. 
 • जाधव यांच्याविरोधात सुनावणीचा फार्स, वकील न देऊन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने न्यायप्रक्रियेचा अनादर केला 
 • खोट्या आरोपांखाली पाकिस्तानमध्ये गेल्या एक वर्षापासून अधिक काळ अटकेत असलेल्या निरपराध भारतीय नागरिकाला व्हिएन्ना करारानुसार दिले जाणारे कोणतेही अधिकार आणि संरक्षण दिले नाही. संपर्काचाही अधिकार हिरावून घेतला. 
 • जाधव यांना वकील देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने वारंवार फेटाळली आणि सुनावणीची कागदपत्रेही भारताला दिली नाहीत 
 • मूलभूत मानवी हक्कांची पाकिस्तानकडून पायमल्ली 
 • पाकिस्तान लष्कराच्या तुरुंगात असताना जाधव यांच्याकडून बळजबरीने जबाब नोंदवून त्या आधारावर आरोप ठेवले. 
 • जाधव यांना फाशी दिल्यास पाकिस्तानवर युद्धगुन्हेगारीचा आरोप ठेवावा लागेल. 
 • जाधव यांच्या कुटुंबीयांनी केलेला व्हिसाचा अर्ज पाकिस्तानकडे अद्यापही प्रलंबित. 

पाकिस्तानने मांडलेले मुद्दे 

 • जाधव यांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडण्याची गरजच नव्हती 
 • जाधव यांच्या पासपोर्टबाबत भारताचे स्पष्टीकरण नाही 
 • भारताची याचिका रद्द करावी 
 • वकील न देण्याचा निर्णय कायद्यानुसारच 
 • जाधव यांना अपिलासाठी दीडशे दिवस दिले होते. 
 • या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाला हक्क नाही 
 • जाधव यांच्या आरोपांबाबत भारताकडून स्पष्टीकरण नाही. 
 • भारताचे सर्व आरोप चुकीचे 

कुलभूषण जाधव टाईमलाईन : 

 • 3 मार्च, 2016 : 'पाकिस्तानविरुद्ध कट रचणे' आणि 'दहशतवादी कारवाया करणे' या आरोपांखाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने इराण सीमेनजीक अटक केली. 
 • 24 मार्च, 2016 : 'कुलभूषण जाधव हे 'रॉ'चे हेर आहेत', असा पाकिस्तानी लष्कराचा दावा. 
 • 26 मार्च, 2016 : पाकिस्तानने भारताच्या उच्चायुक्तांना समन्स बजाविले. 'बलुचिस्तान आणि कराचीमधील दहशतवादी कारवायांमध्ये 'रॉ'च्या अधिकाऱ्याचा हात असल्याचा दावा करत निषेध व्यक्त केला. 'कुलभूषण जाधव 2002 मध्येच नौदलातून निवृत्त झाले होते; त्यांचा सरकारशी संबंध नाही', असे भारताचे स्पष्टीकरण. 
 • 29 मार्च, 2016 : कुलभूषण जाधव यांचा 'कबुली'चा व्हिडिओ पाकिस्ताने जाहीर केला. 
 • 7 डिसेंबर, 2016 : 'कुलभूषण जाधव यांच्याविरोधात पुरेसे पुरावे नाहीत' अशी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताझ अजीझ यांची कबुली. 
 • 31 डिसेंबर, 2016 : 'कुलभूषण यांच्याविरोधातील पुरावे संयुक्त राष्ट्रांकडे सादर करू' असे पाकिस्तानने सांगितले. 
 • 3 मार्च, 2017 : कुलभूषण जाधव यांच्याविरोधातील पुराव्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सरताझ अजीझ यांचा 'यू-टर्न'! 'कोणत्याही परिस्थितीत जाधव यांना भारताकडे सोपविले जाणार नाही' असेही अजीझ यांनी सांगितले. याचा भारताने लगेच निषेध केला. 
 • 10 एप्रिल, 2017 : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली 
 • 10 मे, 2017 : भारताने हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला तात्पुरती स्थगिती दिली. 
Web Title: ICJ stops Pakistan from hanging Kulbhushan Jadhav for now