मॉरिशसमध्ये तेल गळतीने पर्यावरणाची अपरिमित हानी; इतके महत्त्व का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

मॉरिशसच्या किनाऱ्याजवळ अडकून पडलेल्या जपानच्या जहाजातून तेल गळती सुरु झाल्यामुळे पर्यावरणवादी चिंता व्यक्त करत असतानाच या जहाजाचे आता दोन तुकडे झाले.

पोर्ट लुईस- मॉरिशसच्या किनाऱ्याजवळ अडकून पडलेल्या जपानच्या जहाजातून तेल गळती सुरु झाल्यामुळे पर्यावरणवादी चिंता व्यक्त करत असतानाच या जहाजाचे आता दोन तुकडे झाले. यामुळे आणखीनच तेल गळती होत आहे. या जहाजातून तीन हजार टन इंधन बाहेर काढण्यात आले असले तरी आतापर्यंत गळालेल्या तेलामुळे सागरी पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Imageजपानचे एमव्ही वाकाशिओ हे जहाज २५ जुलैला किनाऱ्यावर अडकून पडले. लाटांच्या धडकांमुळे जहाजाला भेगा जाऊ लागल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी आवाज उठविण्यास सुरवात केली. सहा ऑगस्टला या जहाजातून तेल गळती सुरु झाली. जवळपास एक हजार टन इंधनचा जाडसर तवंग समुद्राच्या पाण्यावर पसरला. या तेलगळतीमुळे येथील प्रवाळ बेटांचे आणि नयनरम्य सागर किनाऱ्याचे कायमस्वरुपी नुकसान होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जहाज अडकताच त्यातून तेल काढून घेण्यास उशीर केल्याबद्दल मॉरिशस सरकारवर टीका होत आहे. तसेच, हे जहाज किनाऱ्याच्या इतक्या जवळ कशासाठी आले होते, याचीही चौकशी केली जात आहे. या ठिकाणी अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रीकरणात दिसणारा निळाशार समुद्र आता तेल गळतीमुळे काळा दिसत आहे. 

Imageवॉल स्ट्रिट जर्नलच्या रिपोर्टवरुन भाजप-काँग्रेस समोरासमोर

इतके महत्त्व का? 

ही तेल गळती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात झाली आहे. मॉरिशसमधील ब्लू बे या सागरी संरक्षित ठिकाणापासून जवळच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे तेल गळती आधीच्या घटनांपेक्षा कमी असली तरी परिणाम तितकाच भयानक असू शकतो. या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ आणि केवळ याच ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती उगवतात. येथे १७०० प्रकारचे सागरी जीव असून यामध्ये ८०० प्रकारचे मासे, १७ प्रकारचे सस्तन जीव आणि दोन प्रकारच्या कासवांचा समावेश आहे. याशिवाय प्रवाळ बेटे, खारफुटीचे जंगल आहे. या सर्वांना आता धोका निर्माण झाला आहे. २०१० मध्ये मेक्सिकोच्या आखातात ४ लाख टन तेलाची गळती झाल्यानंतर हजारो सागरी जीवांचा मृत्यू झाला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The immeasurable damage to the environment caused by the oil spill in Mauritius