इम्रान खान पाकचा नवा कर्णधार ?

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जुलै 2018

पाकिस्तानात अकराव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी रात्री सुरू झालेल्या मतमोजणीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने (पीटीआय) बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानात अकराव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी रात्री सुरू झालेल्या मतमोजणीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने (पीटीआय) बाजी मारली आहे. त्यामुळे इम्रान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

इम्रानचा क्रिकेटपटू ते पाकिस्तानचा पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास जबरदस्त आहे. 1992 साली पाकिस्तानला विश्वकरंडक जिंकून दिल्यानंतर इम्रान खान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. त्यानंतर त्याने 1996 मध्ये पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे इम्रानच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही. मात्र 2013 साली खैबर पख्तुनवा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. इम्रानचे जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा त्याला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर नवाझ शरीफ यांना झालेली शिक्षा आणि अन्य प्रतिस्पर्धी बिलावत भुत्तो यांचे अपरिपक्व नेतृत्व इम्रान खान आणि त्याच्या पक्षाच्या पथ्यावर पडले.

दरम्यान, पीएमएल-एनचे अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी या निवडणुकीत जनादेशाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर निवडणूक आय़ोगाने यांचा आरोप फेटाळून लावला आहे. पीएमएल-एनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होण्याची पाकिस्तानच्या 70 वर्षांच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे. पाकिस्तानमध्ये बुधवारी 272 जागांसाठी मतदान झाले होते. 

भारताला इम्रानखानकडून मैत्रीची अपेक्षा नाही...
आता इम्रान खानसारखा क्रिकेटपटू पाकिस्तानचा पंतप्रधान बनणार असला तरी भारताला त्याच्याकडून मैत्रीची अपेक्षा ठेवता येणार नाही. इम्रान एक खेळाडू भारताविरोधात जेवढ्या त्वेषाने खेळला तीच आक्रमकता तो पाकिस्तानचा पंतप्रधान म्हणून दाखवण्याची शक्यता आहे. विशेषतः पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे पाठबळ त्याच्या मागे असल्याने पाकिस्तानचे या संस्थांच्या विरोधात तो जाण्याचे धाडस करणार नाही. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान इम्रानने भारत सरकार आणि भारताविरोधात आक्रमक मते मांडली आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यावर इम्रान खान भारताबाबत काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: imran become new president of pakistan ?