इम्रान खानच्या मंत्रीमंडळाची घोषणा

रविवार, 19 ऑगस्ट 2018

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली आहे. एकूण, 21 जणांचा या मंत्रीमंडळात समावेश असणार आहे. यामध्ये, 2008 च्या मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी परराष्ट्रमंत्री राहिलेले महमूद कुरेशी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. या मंत्रीमंडळातही त्यांच्यावर परराष्ट्र खात्याचीच जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लाहोर- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज त्यांच्या मंत्रीमंडळाची घोषणा केली आहे. एकूण, 21 जणांचा या मंत्रीमंडळात समावेश असणार आहे. यामध्ये, 2008 च्या मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी परराष्ट्रमंत्री राहिलेले महमूद कुरेशी यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. या मंत्रीमंडळातही त्यांच्यावर परराष्ट्र खात्याचीच जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

त्याचबरोबर, तीन महिलांचाही या मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. खैबर प्रांताचे मुख्यमंत्री परवेज खट्टाक यांच्याकडे संरक्षण मंत्रालय, असद उमर यांच्याकडे अर्थ तर शेख रशिद यांच्याकडे रेल्वे खात्याचा कारभार सोपवण्यात येणार आहे. तसेच, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही अरीफ अल्वी यांच्या उमेदवारीची घोषणा पीटीआय या पक्षाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, 'पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ'चे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी काल (शनिवार) पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान यांच्या 'पीटीआय'ला सर्वाधिक बहुमत मिळाले होते. पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष असद कैसर यांनी शुक्रवारी इम्रान खान यांना पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकल्याचे जाहीर केले. त्यानंतर काल (शनिवार) त्यांचा शपथविधी पार पडला.